Tuesday, 21 September 2021

अॅटीबायोटीक्स !

कोविडमुळे झालेल्या एकूण मृत्यूपैकी ६०% मृत्यू हे केवळ अॅन्टीबायोटीकच्या अतिवापरामुळे झालेत, अशी एक बातमी आहे. या दुर्दैवी बातमीत तथ्य असणार, याची मला खात्री आहे. 

मात्र अनेक बहाद्दरांनी बघा बघा तुमच्या औषधांमुळे कसे घातक साईड इफेक्ट्स होतात, असं एक टुमणं लावलंय. त्यांनी एकदा नक्की परिस्थिती काय आहे ती स्वतः पहावी. एकतर बातमीत स्पष्ट 'बेसुमार वापर' म्हटलंय. 'अति सर्वत्र वर्जयेत' हा नियम इथेही लागू होतो आणि कोणतंही शास्त्र विद्येच्या अनिर्बंध वापरास कधीच परवानगी देत नसते. तेव्हा हा दोष वैद्यकशास्त्राचा नक्कीच नाही. लहान मुलाच्या हातात बंदुक दिल्यावर काय घडू शकतं, हे सर्वांनाच कळतं; पण म्हणून बंदूकीला दोष देऊन 'सीमेवरच्या जवानांच्या हातात बंदुका देऊ नयेत, त्याऐवजी दगडगोटेच बरे' असं म्हणणं म्हणजे मुर्खपणा आहे ! त्यापेक्षा आपण जी औषधं वापरतो आणि ज्या डॉक्टरांचा सल्ला घेतो,त्याविषयी योग्य ती माहिती घेणं आवश्यक आहे.तेव्हा यावर बोलायलाच हवं असं मला मनापासून वाटतंय.


अॅन्टीबायोटीक म्हणजे काय ? तर एका सुक्ष्मजीवापासून मिळवलेला असा पदार्थ, जो दुसऱ्या सुक्ष्मजीवाविरुद्ध वापरता येतो, त्याला म्हणायचं अॅन्टीबायोटीक. उदाहरणार्थ, पेनिसिलिअम या बुरशीपासून मिळालेलं 'पेनिसिलीन' हे औषध काही जीवाणूंविरुद्ध (Bacteria) वापरता येतं; तसंच 'स्ट्रेप्टोमायसिस नोडोसम' या जीवाणूपासून मिळालेलं अॅम्फोटेरिसीन हे औषध म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजारात वापरता येतं.


बरीचशी सुक्ष्मजीवविरोधी (Antimicrobials) औषधं आता प्रयोगशाळेत तयार केली जातात. फारंच थोडी सुक्ष्मजीवांपासून मिळवली जातात. तेव्हा सर्वच सुक्ष्मजीवविरोधी औषधांना अॅन्टीबायोटीक म्हणणे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे आहे; पण मुळ बातमीचा मथितार्थ त्यामुळे बदलत नाही. 'सुक्ष्मजीवविरोधी (Antimicrobial) औषधांच्या अतिवापरामुळे ६०% मृत्यू झाले' हे सुधारित विधान आपण लक्षात घेऊ आणि पुढे चर्चा करू.


सातत्याने सुक्ष्मजीवविरोधी औषधं वापरल्यामुळे बरेचदा सुक्ष्मजीव त्या औषधाविरुद्ध कसं लढायचं हे शिकून घेतात, पुढे त्या औषधांचा सुक्ष्मजीवांवर परिणाम होईनासा होतो. याला म्हणतात, 'ड्रग रझिस्ट्न्स',  आपण म्हणूया 'द्रव्यरोध' ! याशिवाय बरेचदा एका सुक्ष्मजीवाविरुद्ध एक औषध वापरल्यास तिथे दुसराच सुक्ष्मजीव बोकाळतो. हे म्हणजे चोरून दूध पितं म्हणून घरातलं मांजर बाहेर सोडून द्यावं, तर घरातले उंदीर माजावेत असा प्रकार असतो. इतकं उदाहरण दिल्यावर या प्रकरणातील औषध वापराची अपरिहार्यता आणि मर्यादा या दोन्हीही गोष्टी लक्षात येतील.


यावर उपाय म्हणजे सुक्ष्मजीवविरोधी औषधांचा बेछूट वापर थांबवणे. गरज असल्यावरंच आणि योग्य ते निदान झाल्यावरंच ही औषधं घेणे आणि त्याचा पूर्ण कोर्स करणे. कोणतीही राष्ट्रीय किंवा जागतिक आरोग्य संघटना, शास्त्रज्ञ, वैद्यकशास्त्राची पाठ्यपुस्तके सुक्ष्मजीवविरोधी औषधांच्या बेछूट वापरास प्रोत्साहन देत नाहीत. जागतिक आरोग्य संघटना तर दरवर्षी १८ ते २४ नोव्हेंबर या काळात  'World Antimicrobial awareness week' साजरा करते.



भारतात आरोग्य व्यवस्थेची काय अवस्था आहे, हे सर्वांना माहित आहे. जेमतेम नावापुढे 'डॉ.' लावण्याइतपत नावापुरतीच पदवी घेऊन गावागावांत टपऱ्या लावणारे असंख्य आहेत. गेल्या अडीच-तीन वर्षांत जी काही भटकंती करून प्रत्यक्ष अनुभव घेतले आहेत, ते हादरवणारे आहेत. साधा सर्दी-खोकला-ताप, जुलाब, पोटदुखी यावर सुक्ष्मजीवविरोधी औषधं देणारे डॉक्टर्स मी पाहिले आहेत. यातील बहुतांश BAMS किंवा BHMS किंवा मध्यमवयीन MBBS पदवीधारक असून, यातील पहिल्या दोघांना बरेचदा या औषधांचे जुजबी म्हणावे इतकेही ज्ञान नसते. आधुनिक वैद्यकशास्त्राचे तरूण पदवीधर हा बेछूट वापर टाळतात, हा माझा सामान्य अनुभव आहे. अर्थात या सर्वांस अपवादही सर्वत्र सापडू शकतील.


घसा दुखला की अझिथ्रो (Azithromycin), पोटात दुखलं की नॉरफ्लॉक्स (Norfloxacin), सर्दी-खोकल्याला अॅमॉक्स (Amoxycillin), जुलाब झाले की मेट्रो (Metronidazole) असा गोळीबार चालू असलेला सहज दिसतो, जो पुर्णतः चुकीचा आहे.  जागतिक आरोग्य संघटनेने वारंवार सूचना देऊनही कोरोनाच्या रुग्णांना डॉक्सिसायक्लीन, अझिथ्रोमायसिन एकत्र देण्यात येतात. त्याचे दुष्परिणाम अनेकांना जाणवतात. बरं ही औषधं आधुनिक असली, तरी देणारा आधुनिक वैद्यकशास्त्राचा पदवीधर असतोच असं नाही. बरेचदा औषधांच्या दुकानात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय या गोळ्या देण्यात आणि घेण्यात येतात. अशावेळी दोष त्या शास्त्राचा किंवा औषधाचाही नसून ती औषधं वापरणाऱ्याचा असतो.


सगळ्यात आधी आपण जे डॉक्टर आपले फॅमिली डॉक्टर म्हणून निवडता, त्यांची पदवी, पदवी देणारं महाविद्यालय जाणून घ्या. डॉक्टर BAMS, BHMS, MBBS अशा ज्या कुठल्या पॅथीचे असतील, त्यांच्याकडून त्याच पॅथीचं औषध घ्या. स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जाण्याची वेळ आली, तरी त्यांच्या ट्रीटमेंटसाठीही आपल्या फॅमिली डॉक्टरांचं 'सेकंड ओपिनियन' घ्या ! सुशिक्षित तरुणांनी मिळालेली औषधं एकदा 'गुगल' करून पाहण्यास हरकत नाही ! मुख्य म्हणजे जे आधीपासून सांगत आलो आहे, टिव्ही-वृत्तपत्रांतील उलटसुलट हेडलाईन्स पाहून गोंधळून जाऊ नका. अधिकृत स्त्रोतांद्वारेच माहिती घेण्याची सवय लावा.


जनहित में जारी !


धन्यवाद !


डॉ. सागर पाध्ये.

Friday, 7 May 2021

एका चाचणीची चाचपणी (RT-PCR आणि सीटी व्हॅल्यू)


गेल्या वर्षी कोविड आला, तशी कोविडसाठीची टेस्टही आली. सोबत शंकाही आल्या आणि अफवाही आल्या. शंका अशी की, आरटी पीसीआर चाचणीतील सीटी व्हॅल्यूचं महत्व काय, त्याचा अर्थ कसा काढावा.


अफवा अशी की, पीसीआरचा शोध ज्यांनी लावला, त्यांनीच ही चाचणी निदान करण्यासाठी वापरू नये, असं सांगितलंय (म्हणे !) शंकेचा विचार आणि अफवेचा समाचार या एकाच लेखात मी घेणार आहे.


PCR अर्थात पोलिमरेज चेन रिअॅक्शन ('बहुवारिकजन्य साखळी प्रक्रिया' म्हणूया ?? नकोच, पीसीआर हा अंगवळणी पडलेला संक्षिप्त शब्दप्रयोग करूयात !) या रासायनिक प्रक्रियेचा शोध लावला कॅरी म्युलीस यांनी. या पद्धतीचा उपयोग काय, तर एखाद्या नमुन्यातील जनुकीय पदार्थ तपासण्यासाठी ! जनुकीय पदार्थ म्हणजे थोडक्यात DNA आणि RNA. समस्या अशी असते, की जिथून कुठूनही आपण हे नमुने घेतो, तिथे प्रत्यक्षात या जनुकीय पदार्थाचं प्रमाण फारंच कमी असते. पण योग्य वातावरणात, आवश्यक त्या रसायनांच्या साहाय्याने डिएनए स्वतःच्या अनेक नकला बनवू शकतात. म्हणजे समजा, मी जे सॅम्पल घेतलं, त्यात एकंच डिएनए आहे; हा डिएनए काही मला लगेच दिसणार नाही, मग विशिष्ट तापमानात काही रसायनांच्या समवेत हे सॅम्पल ठेऊन द्यायचं. काही काळाने एकाच डिएनएच्या दोन, चार, आठ, सोळा अशा प्रती बनत राहतील, हे झालं अॅम्पलिफिकेशन ! काही काळाने डिएनएची मात्रा इतकी वाढेल, की आता मला तो शोधून काढणे सहज शक्य होईल ! यामागे तत्व एकंच, "आडातंच नसेल, तर पोहऱ्यात कुठून येईल ?" मुळ नमुन्यात जर डिएनए नसताच, तर तो अॅम्पलिफाय करता आलाच नसता.


सामान्यत डिएनएच्या मदतीने आरएनए (RNA) तयार करता येतो. या प्रक्रियेला म्हणतात, ट्रान्सक्रिप्शन ! ही आपल्या शरीरात घडणारी सामान्य प्रक्रिया आहे. कोरोना विषाणूकडे फक्त आरएनए असतो, तो शोधण्यासाठी त्या आरएनएपासून डिएनए तयार करतात, हे मुळ प्रक्रियेच्या नेमकं उलट आहे, म्हणून याला म्हणतात, रिवर्स ट्रान्सक्रिप्शन. म्हणून या चाचणीस म्हणतात - 'रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेस पॉलिमरेज चेन रिअॅक्शन' अर्थात RT PCR. 


एकदा कोरोनाच्या आरएनएपासून डिएनए तयार केला, की आधी सांगितल्याप्रमाणे या डिएनच्या आपल्याला उघडकीस आणता येतील इतपत प्रती बनवल्या जातात.  संपूर्ण प्रक्रिया एकदा केली की दुप्पट प्रती मिळतात, मग चौपट, मग आठपट... अशी साखळी सुरु राहते. अशी एकवेळची प्रक्रिया म्हणजे एक सायकल, अशा जितक्या सायकल्स लागतील, त्याला म्हणतात Cycle threshold अर्थात CT Value. 


आणखी सोपं करून सांगायचं, तर नमुन्यातील जनुकीय पदार्थाचं (DNA/RNA) प्रमाण जितकं कमी, तितकेवेळा या प्रक्रियेचं चक्र परत परत फिरवावं लागतं. थोडक्यात सीटी व्हॅल्यू जितकी जास्त, नमुन्यातील विषाणूजन्य आरएनएचं प्रमाण तितकं कमी आणि सीटी व्हॅल्यू जितकी कमी, विषाणूजन्य आरएनएचं प्रमाण तितकं जास्त; असं हे व्यस्त प्रमाण आहे.


आता मुळ शंकेकडे येऊ ! उपरोक्त माहितीवरून सीटी व्हॅल्यू कमी किंवा जास्त असण्यावर कोविडची तीव्रता किंवा संसर्ग कमी-अधिक असल्याचे जोखता येईल का, असं कोणालाही वाटणं स्वाभाविक आहे; पण प्रत्यक्षात तसं नाही. कारण, या चाचणीत अन्य घटकही येतात, ज्यानुसार सीटी व्हॅल्यू बदलते. उदा. -


अ) चाचणी करण्यासाठी ठराविक रसायनांचा एक संच (Kit) वापरला जातो. प्रत्येक प्रयोगशाळेत हा संच भिन्न असू शकतो हा संच बदलला की सीटी व्हॅल्यू बदलते.


ब) नमुना घेताना काही चुकीने, किंवा अन्य कारणाने नमुन्यात विषाणूजन्य आरएनएचं प्रमाण कमी आलेलं असू शकते.


क) नाकातून किंवा घशातून अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून स्वॅब घेतल्यास सीटी व्हॅल्यू बदलते.


ड) नमुना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाताना साधलेलं तापमान वगैरे लहानसहान घटकांनी सीटी व्हॅल्यू बदलते.


सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोविडची तीव्रता आणि सीटी व्हॅल्यू यांच्यात कोणताही परस्परसंबंध आढळलेला नाही आणि अशाप्रकारे आजाराची तीव्रता ठरवूही नये, असे ICMR ने ऑगस्ट २०२० रोजी जाहीर केले आहे.


त्यामुळे तुमच्या रिपोर्टमध्ये सीटी व्हॅल्यू कितीही असली, तरी काहीही निष्कर्ष काढू नका. ही व्हॅल्यू फारतर प्रयोगशाळेत संदर्भासाठी वापरली जाते.


आता अफवेकडे वळू, विविध माध्यमांतून, लेखांतून एक गोष्ट अधोरेखित करण्याचा काहीजण प्रयत्न करत असतात; की पीसीआरचा जनक कॅरी म्युलिस यांनीच असं म्हणून ठेवलंय, की 'पीसीआर ही चाचणी कोविडचं निदान करण्यासाठी नाही'. हे विधान अर्धवट आणि दिशाभूल करणारं आहे. पहिली बाब, कोविड येण्याआधीच कॅरी म्युलिस यांचा मृत्यू झाला (ऑगस्ट २०१९) आणि त्यांनी स्वर्गातून काहीही संदेश पाठवल्याचे कोणत्याही 'स्वर्ग रिटर्न' महात्म्याने सांगितल्याचे ऐकीवात नाही. मग कॅरी म्युलिस यांनी अशा प्रकारचं कोणतंही विधान त्यापूर्वी केलं होतं का ? तर त्यासाठी या प्रकरणाच्या थोडं खोलात जाऊ.


पीसीआरचा शोध लागला १९८३ साली. एखाद्या नमुन्यातील जनुकीय पदार्थ (DNA/RNA) शोधावा, इतकाच याच उपयोग. आता एखादा वैशिष्ट्यपूर्ण डिएनए तुम्ही शोधला, म्हणजे त्या डिएनचा नमुन्याशी संबंध जोडता येतो. उदा. या चाचणीने सिकल सेल अॅनिमिया, थॅलासेमिया असे अनुवंशिक आजार, विषाणू वा जिवाणूजन्य आजार, कर्करोग असं काहीही शोधता येते. 'आडात आलं, म्हणजे पोहऱ्यात असणारंच' असं सोपं तर्कशास्त्र यामागे आहे !


पुढे १९८६ साली एचआयव्ही विषाणूंचा शोध लागला. याच दशकात एड्सचा राक्षस मानवजातीसमोर उभा राहिला होता. एड्स आणि एचआयव्हीचा संबंध त्यावेळी निर्विवाद प्रस्थापित व्हायचा होता. शास्त्रज्ञांची मतमतांतरे होती. त्यावेळी (१९९३ साल) त्यांनी केलेलं विधान पुढीलप्रमाणे, "संख्यात्मक (quantitative) पीसीआर हा विरोधाभास आहे. पीसीआर वापरण्यामागचा मुळ उद्देश हा पदार्थांचा गुणात्मक (qualitative) शोध घेणे हा आहे, मात्र चाचणीचा मुळ गुणंच असा, की पदार्थाची संख्या ठरवता येत नाही. (हेच यापूर्वी लेखात सांगितलं आहे). सामान्यतः विषाणूभार चाचण्यांचा (Viral load tests) उपयोग विषाणूंची संख्या मोजण्यासाठी होतो, असा गैरसमज जरी असला, तरी या तपासण्या मुक्त स्वरुपातील, किंवा संसर्गजन्य विषाणू शोधू शकत नाहीत. काही ठराविक प्रथिनं जी एचआयव्हीशी संबंधित असल्याचं समजलं जातं, जे बरेचदा चूकही असू शकतं, ती शोधण्यासाठी या चाचणीचा वापर होत आहे. ही चाचणी विषाणूचा जनुकीय अनुक्रम शोधते, प्रत्यक्ष विषाणू नव्हे !"


ही विधानं, व्यवस्थित वाचल्यावर लक्षात येईल, की कॅरी म्युलिस यांनी पीसीआरबद्दल जे सांगितलं ते वैज्ञानिकदृष्ट्या योग्यंच आहे. पण त्याचं हे मत एचआयव्हीबद्दल आहे. कुठल्याही प्रकारचं निदान करण्यासाठी ही चाचणी वापरू नका, किंवा ही चाचणी निदान करण्यासाठी शोधलेलीच नाही; असं विधान त्यांनी कुठेही केल्याचं माझ्यातरी वाचनात आलेलं नाही. कोविडबद्दल असं विधान त्यांनी करणं अशक्य आहे. तरीही भाबडेपणाने म्हणा, किंवा धुर्तपणाने म्हणा, या अशा अफवा पसरवल्या जातात. सद्यपरिस्थितीत SARS COV2 हा विषाणू एखाद्या व्यक्तीच्या शरीरात आहे वा नाही, हे शोधण्यासाठी RT PCR इतकी विश्वसनीय चाचणी अन्य कोणतीही नाही. दुसरी एखादी चाचणी कोणी शोधून काढलीच, तर तिचा स्वीकार करणं, कोणालाही कमीपणाचं वाटणार नाही, कारण विज्ञान हे प्रवाही असतं ! साचून राहतं, ते डबकं होतं !


डॉ. सागर पाध्ये.


(इमेज साभार - https://inflammregen.biomedcentral.com/articles/10.1186/s41232-020-00147-2)



Sunday, 18 April 2021

दृष्टी आणि दृष्टिकोन


गेल्या शतकभरात विज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड उलथापालथ झाली, त्याबरोबर एकूणंच अणूपासून ब्रह्मांडापर्यंत प्रत्येक पदार्थाकडे पाहण्याची आपली दृष्टी विस्तारत गेली आणि दृष्टिकोन बदलत गेला.


भारतात आर्यभट्ट-भास्कराचार्यांपासून चालत असलेली संशोधनपरंपरा मधल्या काळात खुंटली आणि दुसरीकडे सतराव्या शतकापासून पाश्चात्यांनी आधी गणित आणि मग भौतिक, रसायन आणि जीवशास्त्र या तिनही क्षेत्रांत हातात हात घालून एकापाठी एक उत्तुंग शिखरं गाठली. 


साधारण तेराव्या शतकापासून माणूस भिंगांचा वापर करत असे. सतराव्या शतकाच्या सुरुवातीपासून सुक्ष्मदर्शकांचा वापर सुरु झाला आणि आपल्या नजरेसमोरंच पण नजरेपलीकडचेही एक सुक्ष्म जग आहे, याची जाणीव मानवाला झाली. मानवी पेशी, सुक्ष्मजीव यांबाबतची ही नवीन दृष्टी प्राप्त होऊ लागली, तसा मानवी शरीर आणि आरोग्य यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन विस्तृत होत गेला.


शरीराच्या आतमध्ये डोकावून पाहण्यासाठीही विविध तंत्रे विकसित होत गेली. आधी रॉन्टजेन नावच्या शास्त्रज्ञाकडून अपघातानेच एक्स-रे प्रतिमांचा शोध लागला. एक्सरे धातूंना भेदून पलीकडे जाऊ शकत नाहीत. हाडांमध्ये कॅल्शिअम असल्याने एक्स रे फिल्मवर हाडं तेवढी पांढऱ्या रंगाची दिसतात, बाकी सर्व राखाडी, काळ्या रंगाचे दिसते. हाडांची रचना, तुटलेली हाडे पाहणे शक्य झाले. नंतर अशाच प्रकारचे काही अपारदर्शक द्रवं पचनमार्गामध्ये तोंडाद्वारे किंवा गुदमार्गाने पाठवून पचनमार्गाच्या विकारांचं निदान करणं शक्य झालं. अशा द्रवांना 'कॉन्ट्रास्ट एजंट' म्हणतात. आपण त्यांना 'द्रवदूत' म्हणू ! ते शरीरात जाऊन तिथली माहिती आपल्याला पाठवतात म्हणून !


पारंपरिक क्ष किरण अभ्यासाला तरी मर्यादा होत्या. एकतर शरीराकडे कोणत्यातरी एकाच बाजूने बघता येत असे. मेंदू, फुफ्फुसे, हृदय, प्लीहा, यकृत, स्वादुपिंड अशा कितीतरी अवयवांच्या जटील रचना पाहता येत नव्हत्या. पुढे एका विशिष्ट परिघात सर्व बाजूंनी क्ष किरणे सोडून त्यावरून शरीराचे आतील अवयव पाहण्याचे प्रयत्न सुरू झाले. हा झाला सीटी स्कॅन ! आता गाजर किंवा टोमॅटोचे आडवे काप घेऊन आतली रचना पहावी त्याप्रमाणे, शरीराची आंतर्रचना पाहणे शक्य होऊ लागले. असा उपयुक्त सीटी स्कॅन विल्यम हाऊन्सफिल्डने बनवला तोपर्यंत १९७२ साल उजाडले होते. यात सुधारणा होत, हाय रिझोल्युशन (High resolution) सीटी स्कॅन (HRCT) तयार झाले. विशेषतः फुफ्फुसांचे आजार अशा पद्धतीने अभ्यासता येतात. यात पुन्हा आपले 'द्रवदूत' वापरले, तर Contrast enhanced CT scan (CECT) तयार होतात. मात्र यात अजूनही शरीरातील मऊ भाग, विशेषतः ज्यांमध्ये द्रवाचे प्रमाण अधिक असते, ते सुस्पष्ट दिसत नव्हते. पुन्हा क्ष किरणांशी संबंध येत असल्याने किरणोत्सर्गाचा धोका वारंवार उद्भवत होता.


दुसरीकडे विज्ञानाचीही वाटचाल चालूच होती. १९३८ साली इसिडॉर राबी या शास्त्रज्ञाने अणुकेंद्रांच्या चुंबकीय अनुनादावर (nuclear magnetic resonance)  संशोधन केलं. एका विशिष्ट चुंबकीय क्षेत्रात अणूकेंद्रे रांगेत उभी राहतात, त्यासोबत थोड्या कमी तीव्रतेचं दुसरं चुंबकीय क्षेत्र काटकोनात निर्माण करून त्याची तीव्रता कमी-जास्त करत राहायची, की या केंद्रांची शिस्त बिघडते, ज्यावेळी ही केंद्रके आपली जागा सोडतात, त्यावेळी त्यांच्या पाऊलखुणा विद्युतचुंबकीय लहरींद्वारे ओळखता येतात. या लहरी चरबी, पाणी अशा प्रत्येकासाठी भिन्न असतात. त्यामुळे निराकार वाटणाऱ्या लहरींना आपल्याला समजेल असे, साकार स्वरुप देणे शक्य होते. म्हणजे असं पहा, एखाद्या कडक शिस्तीच्या शिक्षकांनी मुलांना रांगेत उभं करून ठेवलं आहे, पण एखादा वात्रट आडदांड मुलगा मध्येच रांगेतून उभा आडवा पळतो; आता सारीच मुलं गोंधळतात, जागा सोडतात, पण त्यांच्या पायांच्या ठशावरुन आधी रांग कशी होती हे हे ठरवायचंय, कोण विद्यार्थी कुठे उभा होता हेही ठरवायचंय ! म्हटलं तर इतकं सोपं, नाहीतर फारंच कठीण काम ! या संशोधनाच्या उपयोजनाबद्दल फेलीक्स ब्लॉच आणि एडवर्ड पर्सेल या शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिक मिळालं.


मात्र या संशोधनाचा उपयोग पूर्वी निर्जीव वस्तूंच्या रचना अभ्यासण्यासाठी होत होता. तंत्र अगदीच बाल्यावस्थेत होतं आणि मानवी शरीरासाठी याचा वापर करण्याची कल्पना सुचायला आणि प्रत्यक्षात यायला आणखी तीस वर्षं लागली. पॉल लॉटेरबर या शास्त्रज्ञाला ही कल्पना एक दिवस जेवता जेवता सुचली, त्याने ती सरळ आपल्या टेबल नॅपकीनवर खरडली आणि पुढे संधी मिळताच संशोधनाला सुरुवात केली. विद्यापीठातली सारी कामं आटोपली, की पॉल रात्री विद्यापीठातील MRI मशिनसोबत प्रयोग करायचा. त्याने आधी एका शिंपल्याच्या अशा प्रतिमा मिळवल्या, त्यानंतर पाण्याचीच दोन वेगवेगळी द्रावणे तयार करून त्यांच्या प्रतिमा मिळवण्याच्या प्रयत्न केला आणि ह्यात बऱ्यापैकी यश मिळवलं. पॉलला मिळालेल्या प्रतिमांमधून दोन भिन्न द्रावणांमध्येही फरक करणं शक्य होत होतं. आजपर्यंत हे कोणालाही जमलं नव्हतं. पॉलने हे संशोधन 'नेचर' या वैज्ञानिक नियतकालिकापर्यंत पोहोचवलं खरं, पण त्यांनी या संशोधनास सरळ कचऱ्याची पेटी दाखवली. अर्थात पॉल काही निराश झाला नाही. अखेर 'नेचर'लाच हे संशोधन प्रसिद्ध करावं लागलं.


पॉलला यश मिळालं असलं, तरीही त्यात सुधारणा करण्यास पुष्कळ वाव होता. इथे आपल्या कथेचा आणखी एक नायक समोर येतो - पीटर मॅन्सफिल्ड ! लंडनमध्ये जन्माला आलेल्या पीटरची सुरुवातीची काही वर्षे दुसऱ्या महायुद्धामुळे बरीच आबाळ झाली. थोडा स्थिरस्थावर झाल्यावर शाळेत प्रवेश घेतेवेळी प्राथमिक गुणवत्ता परीक्षेत नापास झाल्याने पीटरला प्रवेश नाकारला गेला. त्यानंतर दुसऱ्याच एका शाळेत त्याने प्रवेश घेतला. पंधराव्या वर्षी तिथल्या शिक्षकांनी 'विज्ञान' हे तुझ्यासाठी नाही, असं सांगून त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. मग काहीकाळ इथेतिथे कामं करून, दोन वर्षांसाठी सैन्यात भरती होऊन पीटर परत आला. रात्रशाळेत जाऊन अभ्यास करता करता त्याने लंडनच्याच क्वीन मेरी महाविद्यालयात भौतिकशास्त्र शिकण्यासाठी प्रवेश घेतला. पुढे पीटरने पॉलच्या संशोधनात काही मुलभूत बदल घडवले. MRI तयार करण्याची प्रक्रीया अधिक वेगवान झाली. विद्युतचुंबकीय लहरींचा गुंता सोडवून त्याची प्रतिमा तयार करण्यासाठी पीटरने 'फॉरिअर ट्रान्सफॉर्मेशन' या गणितीय पद्धतीचा वापर केला आणि अधिक सुस्पष्ट प्रतिमा मिळू लागल्या. आता शरीरातील मऊ अवयव पाहता येणे शक्य झाले. सीटी स्कॅनपेक्षाही अधिक सुस्पष्ट प्रतिमा मिळू लागल्या. यथावकाश पॉल लॉटेरबर आणि पीटर मॅन्सफिल्ड अशा दोघांनाही नोबेल पारितोषिक मिळालं.




अगदी गणिताचाही वापर मानवी जीवनाच्या कल्याणासाठी कसा होत गेला, याचं हे संशोधन म्हणजे उत्तम उदाहरण ! आज वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेली मुलं पहिल्याच वर्षात फिजिओलॉजी (शरीरक्रियाशास्त्र) आणि बायोकेमिस्ट्री (जीवरसायनशास्त्र) असे दोन विषय शिकतात, हे दोन्हीही विषय म्हणजे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांच्या उपशाखाच ! यातली कुठलीही शाखा वैद्यकक्षेत्रापासून वेगळी करता येत नाही. उलट त्यांच्या उपयोजनातून जी दृष्टी प्राप्त होते, त्यातून आपला दृष्टीकोन मात्र विस्तारत जातो.


हृदयाच्या ठोक्यांपासून ते आतड्यांच्या चलनापर्यंत शरीराच्या अवयवांचे हे चलवलन म्हणून बदलत्या विद्युतभारांचा खेळ असतो, हे आपल्याला अभ्यासातून कळले. अगदी ऋण ऐंशी-नव्वद ते धन ऐंशी मिलीव्होल्ट इतके विभवांतर शरीर खेळवत असते, असं भौतिकशास्त्र सांगू लागले. त्यांचे नियमन म्हणजे खंडीभर रसायनांचा पकडापकडीचा खेळ, हे रसायनशास्त्राने दाखवून दिले. या रसायनांचाच अभ्यास करून आपण रक्ताच्या चाचण्या करतो. अमकीतमकी टेस्ट करून या असं सांगण्यापूर्वी अमुक रसायन शरीरात कुठे निर्माण होतं, ते कुठे जातं, कुठल्या पेशींची दारं ठोठावतं, हे सारं डॉक्टरांना माहीत असतं (काहीजण माहित नसतानाही ढीगभर टेस्ट्स लिहून देतात, आणि करून घेतात तो भाग वेगळा !) तसंच एखादा अवयव पाहण्यासाठी सीटी स्कॅन, एमआरआय, एक्स रे यापैकी काय वापरावं, हे सांगण्यासाठी शरीररचनेसोबतंच त्यापाठचं भौतिकशास्त्रही जाणून घेणं गरजेचं असतं.


मी MBBSला प्रवेश घेतला तेव्हापासून 'तुझी पॅथी काय ?' हा मला सर्वाधिकवेळा विचारलेला प्रश्न ! त्यावर माझी कोणतीही पॅथी नाही, हे माझं ठरलेलं उत्तर ! विस्फारलेल्या डोळ्यांनी मग समोरचा, "अरे, MBBS म्हणजे 'अॅलोपॅथी' ना ?" , असं विचारतो. त्यावर मी, "ह्याट्ट, ते असंच कोणी पूर्वी म्हणत. आमचं असं काही नसतं. जे जे विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध होत गेलं, ते सारं आम्ही स्विकारलं,.जे सिद्ध होईल ते स्विकारू, जे चुकलं ते सोडून देऊ. आमची पॅथी म्हणजे विज्ञान !"


वैद्यकशास्त्राच्या वैज्ञानिक जडघडणीचा एक छोटासा पैलू सांगण्याचा हा प्रयत्न ! विज्ञानाच्या शाखा-उपशाखा एकमेकींशी किती दृढ नाती बाळगून आहेत हे नेमकं सांगण्यासाठी वरची कथा उदाहरण म्हणून सांगितली. ब्रह्मांडाइतकीच मानवी शरीराची गुंतागुंतीची रचना, तिथले नियम ठरवणे म्हणजे कापसाचाच एक एक धागा हाताने विलग करून मांडण्यासारखा आहे. पण तेही काम माणूस हळूहळू करत आहे. कालच्यापेक्षा आजची माहिती सुधारीत आहे, पण त्यासाठी कालची अपूर्णता आणि त्रुटीही मान्य करणे गरजेचे आहे. अज्ञान मान्य करण्यात विज्ञानाचा उगम आहे !


डॉ. सागर पाध्ये

Tuesday, 17 March 2020

कोरोना - सत्य आणि मिथ्या



कोरोनावरच्या अनेक खऱ्याखोट्या पोस्ट्स, विडीओज्, प्रेझेंटेशन्स, पोस्टर्स या सगळ्या गाठोड्यात मी आणखी माझ्या हातची पुरचुंडी करून टाकणार नाही, हे ठरवलं होतं; पण कालपासून एक व्हिडीओ किंवा त्याच अर्थाचं लिखाण वेगवेगळ्या मार्गांनी पहायला/वाचायला मिळालं आणि आता काही गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजेत असं वाटलं.

सदर पोस्ट्स फॉरवर्ड करताना हे KEM हॉस्पिटलचे डीन, श्वसनविकारतज्ञ किंवा अमुकतमुक अशी माहिती चिकटवली जाते. तरी मी मुळ स्त्रोतापर्यंत जाण्याचा प्रयत्न केल्यावर एका युट्युब चॅनेलने घेतलेल्या या मुलाखतीत माहिती देणारी व्यक्ती एक प्रतिष्ठीत व प्रथितयश डॉक्टर आहेत हे लक्षात आलं. वैद्यकीय शिष्टाचारास अनुसरून, या डॉक्टरांचे नाव, फोटो, मुळ विडीओ किंवा पोस्ट असं काहीही मी आता जाहीर करणार नाही. केवळ सामान्यजनांच्या माहितीखातर काही गोष्टींचं स्पष्टीकरण देत आहे.


सदर व्यक्ती कोरोनाच्या संसर्गाबद्दल लोकांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नसल्याचे सांगून, त्यांनी 'आपल्या देशात टीबी, मलेरिया, लहान मुलांचे श्वसनविकार, हगवण या अधिक गंभीर समस्या आहेत' असे म्हटले आहे, ते बरोबरंच आहे. पण त्यानंतर 'कोरोना'बद्दल माहिती देताना गडबड झाली आहे.

'कोरोना'बद्दलची माहिती सदर व्यक्ती आपल्या मोबाईलमध्ये बघून देते. या मोबाईलमधल्या माहितीचा स्त्रोत आपल्याला कळणे अशक्य आहे, परंतू काही दिवसांपासूनंच 'युनिसेफ'च्या (unicef) नावाने अतिशय चुकीची व विपर्यस्त माहिती सोशल मिडीयावर शेअर केली जात आहे. या प्रकरणात अखेर 'युनिसेफ'लाच लक्ष घालून 'आमच्या नावाने चुकीची माहिती पसरवू नका' असे आवाहन करावे लागले. युनिसेफचे स्पष्टीकरण वाचण्यासाठी क्लिक करा

युनिसेफच्या नावावर खपवली जाणारी माहिती आणि सदर विडीओत दिलेली माहिती, यात बरेच साधर्म्य आहे. काय आहे ही माहिती ? त्यातील तथ्य काय ? मिथ्या काय ? तर त्याची उत्तरे -

१. असत्य - कोरोना हा विषाणू ४०० ते ५०० मायक्रोमीटर इतका मोठा आहे.
सत्य - वरील विधान पुर्णत: चुकीचे आहे. विषाणू इतके मोठे कधीच नसतात. वैद्यकियदृष्ट्या महत्वाच्या विषाणूंपैकी सर्वात मोठा विषाणू हा पॉक्सवायरस (Poxvirus) समजला जातो. तोसुद्धा केवळ ०.२ × ०.३ मायक्रोमीटर असतो. कोरोनाबाबत बोलायचं, तर 'कोरोना' कुटुंबातील विषाणू केवळ ०.१२ मायक्रोमीटर इतक्याच आकाराचे आहेत (खालील लिंक पहा). मानवी केसही १७ ते १०० मायक्रोमीटर इतके जाड असतात. पाचशे मायकमायक्रोमीटर म्हणजे अर्धा मिलीमीटर. एवढ्या आकाराचे धुळीचे कण असतात, विषाणू नव्हे !
कोरोना विषाणूची सुक्ष्मजीवशास्त्रीय माहिती वाचण्यासाठी क्लिक करा

२. असत्य - आकाराने इतका मोठा वा वजन असल्याने हा विषाणू 'पडतो' (ग्राउंडेड आहे !)
सत्य - मुळात हा विषाणू इतका मोठा नाही, हे आधीच स्पष्ट केले आहे. दूषित पृष्ठभागावरूंन आपल्या हातांवर आणि तिथून नाका-तोंडाजवळ असा हा विषाणू प्रामुख्याने पसरतो. शिवाय शिंक, खोकला यांतून उडालेले तूषार यांच्यामुळे हवेतूनही पसरू शकतो. 'यामुळेच संशयित रुग्ण वा आजारी व्यक्तीपासून किमान एक मीटर (तीन फूट) इतके अंतर राखण्यास तसेच जिथे गर्दी होईल, असे सामाजिक कार्यक्रम वा उपक्रम टाळण्यास सुचवले जात आहे.'
जागतिक आरोग्य संघटनेची माहिती -
कोविड -१९ कसा पसरतो, याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली माहिती (how does Covid-19 spread ?)

३. असत्य - कोरोना विषाणू हा २५° -२७°से. वातावरणातंच टिकू शकतो. आपल्याकडील वातावरणात तो टिकणार नाही. मेटल सरफेसवर बारा तास, कपड्यावर नऊ तास कोरोना टिकतो असे ठाम आकडेही या विडीओ/पोस्टमध्ये दिलेले आहेत
सत्य - कुठलाही विषाणू उष्ण तापमानात विशेषतः ४०° पासून पुढे निष्प्रभ होत जातो हे खरे आहे. पण मानवी शरीराचे तापमान कायम ३६° ते ३७°से. राखले जाते. त्यामुळे बाहेरील वातावरणाचा कोरोनावर काय परिणाम होणार आहे ? विषाणू शरीराच्या बाहेर येऊन एखाद्या पृष्ठभागावर पडला, तर बाहेरच्या वातावरणाचा विषाणूवर परिणाम होईल; तिथे तो विषाणू किती काळ टिकेल हे असं कोणालाही ठामपणे सांगता येणार नाही. तापमानाचा कोरोनासंसर्ग व प्रादुर्भाव यावर फारसा परिणाम होत नाही, असेही जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.
पुढील दोन लिंक्स पहा -
1. कोरोना विषाणू पृष्ठभागावर किती काळ टिकू शकतो ? जागतिक आरोग्य संघटनेची माहिती# (How long corona survives on surface ?)
2. 'कोरोना'बाबतच्या अफवांचे जागतिक आरोग्य संघटनेने केलेले खंडन

४. असत्य - मिठाच्या पाण्यामुळे 'कोरोना'ला अटकाव होईल.
सत्य - मिठाच्या पाण्याने नाक वगैरे धुतल्याने सामान्यत: सर्दीला (कॉमन कोल्ड) अटकाव होऊ शकतो. कोरोनावर याचा परिणाम होतो, असा कोणताही पुरावा नाही. (वरच्या प्रश्नातील दुसऱ्या क्रमांकाची लिंक पहावी).

५. पुढे याच विडीओत गोमुत्र, शेण खावे (??) का, या प्रश्नाला त्यांत अॅन्टीऑक्सिडंट्स, अॅन्टीबायोटीक्स असतात, असे उत्तर दिले. 'अॅन्टीबायोटीक्स'ची संज्ञा एका डॉक्टरने अशी अगदीच ढोबळपणे वापरावी, हे आश्चर्यकारक आणि खेदजनक आहे.

असो, सदर पोस्टचा उद्देश कोणावरही टिका वा बदनामी नसून, चुकीच्या माहितीचे निराकरण करणे हा आहे, हे लक्षात घ्यावे. समजा, माझी ही पोस्ट उपरोल्लेखित चुकीची माहिती देणारे विडीओ वा पोस्ट्स शेअर करणारी पेजेस्, यु ट्यूब चॅनल्स, फेसबुक वा ट्विटर अकाऊंट्स इ. च्या वाचनात आली, तर कृपया त्यांनी ही चुकीची माहिती आणखी पसरवणे टाळावे.

( याशिवाय इतर विविध पोस्ट्समधील लसूण खाणे, गरम पाण्याने आंघोळ करणे, क्रोसिनच्या दोन गोळ्या खाणे वगैरेही अफवा जागतिक आरोग्य संघटनेने धुडकावून लावलेल्या आहेत. सद्यस्थितीत कोरोनावर कोणतेही निश्चित उपचार उपलब्ध नाहीत. कोणी तसा दावा करत असल्यास ती थाप समजावी !)


'कोरोना' विषयक अधिकृत माहिती कुठे मिळेल, असे अनेकजण विचारत आहेत,
त्यांच्यासाठी पुढे काही लिंक्स देत आहे.
सार्वजनिक आरोग्य सेवा, महाराष्ट्र शासन यांची अधिकृत वेबसाईट. या वेबसाईटवर सर्व सामान्य व्यक्तींना समजेल अशाप्रकारे केवळ कोरानाच नव्हे, तर इतरही आजारांची माहिती व शासनाच्या उपाययोजना यांबाबत माहिती मिळेल. विशेषतः खाली दिलेल्या लिंकवर पहिल्याच क्रमांकाची पीडीएफ फाईल डाऊनलोड करून घ्या आणि शेअरही करा. त्यात कोरानाविषयी आवश्यक ती सर्व माहिती आहे.
कोविड-१९ बाबतची माहिती पीडीएफ स्वरुपात वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा


सार्वजनिक आरोग्य सेवा, महाराष्ट्र शासन यांचे फेसबुक पेज -
सार्वजनिक आरोग्य सेवा, महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत फेसबुक पेज पाहण्यासाठी क्लिक करा

अधिकृत ट्विटर हॅन्डल
(@MahaHealthIEC): https://twitter.com/MahaHealthIEC?s=09

२. ज्यांना अधिक खोलात जाऊन अभ्यास करायचा आहे, अपडेटेड राहायचे आहे त्यांच्यासाठी -
जागतिक आरोग्य संघटना सातत्याने नवनवीन माहिती अपडेट करत आहे. कोरोनाचे नवीन रुग्ण, आजाराबाबतची वर्तमानकालीन परिस्थिती व प्रगती ही दररोज अपडेट होत आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) ची अधिकृत वेबसाईट -
www.who.int

याशिवाय 'युनिसेफ' ही आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती देणारी दुसरी वेबसाईट आहे.
www.unicef.org

३. भारत सरकारतर्फे मिळणारे अपडेट्स पाहण्यासाठी -
www.mohfw.gov.in

४. विज्ञान विषयातील वा वैद्यकीय पदवीधर,आरोग्यसेवा कर्मचारी, चिकित्सक वाचक यांना सदर विषाणूबद्दल सुक्ष्मजीवशास्त्रीय माहिती हवी असल्यास, National Center for Biotechnology information या अमेरिकन वेबसाईटवरून माहिती मिळेल.
https://www.ncbi.nlm.nih.gov/

याशिवाय जगातील सर्वात जुने, वैद्यकीय विषयावरील नियतकालिक The Lancet यांची अधिकृत वेबसाईट -
https://www.thelancet.com/

संकलन - डॉ. सागर पाध्ये

(कृपया अधिकृत स्त्रोतांद्वारेच माहिती घ्या, ज्या माहितीचा स्त्रोत प्रत्यक्ष खात्री करून घेणे शक्य नाही, अशा पोस्ट्स फॉरवर्ड करणे टाळा.)


धन्यवाद !

डॉ. सागर पाध्ये
drsagarp12@gmail

Friday, 15 February 2019

चिन्ता दहति जिवितम् (अँक्झाईटी आणि पॅनिक डिसॉर्डर)

चिन्ता दहति जीवितम्...
(अँक्झाईटी व पॅनिक डिसॉर्डर )

अनन्य.. थर्ड मेजर 'एमबीबीएस'चा विद्यार्थी.. आज त्याची सर्जरी विषयाची प्रात्यक्षिक परिक्षा आहे. कालपासून रात्रभर जागून अभ्यास करून अनन्य परिक्षेला आला. सर्जरीची परिक्षा म्हणजे खायचं काम नव्हे. विद्यार्थी कितीही हुशार असला, तरी सर्जरीच्या नावाने पोटात गोळा येतो. अनन्यही आज अस्वस्थ होता; पण यावेळेस परिस्थिती वेगळी होती. अनन्यच्या छातीत सारखी धडधड होत होती. मधूनंच दरदरून घाम फुटत होता. हातपाय सारखे लटलट कापत होते. रात्री खरंतर त्याचे थोडावेळ झोपण्याचाही प्रयत्न केला होता; पण झोपंही आली नव्हती. परिक्षेत आपल्याला कमी गुण मिळतील, याहीपेक्षा आपल्याला काहीही येणार नाही आणि सगळे शिक्षक, रुग्ण आणि विशेषतः 'तिच्या'समोर आपलं फार हसू होईल, सगळे खिल्ली उडवतील अशी प्रचंड भिती अनन्यला वाटत होती. अखेरीस अनन्यच्या डोळ्यासमोर अंधारी आली, छातीत फार धडधड होऊन त्याला आता धाप लागली आपण घुसमटतो की काय अशी भिती त्याला वाटून चक्क सगळ्यांची नजर चुकवून परिक्षाकेंद्रातून बाहेर आला आणि लांब पळत सुटला. धावत-धडपडत स्वतःच्या खोलीत आला आणि बिछान्यावर स्वत:ला झोकून देऊन डोक्यावर उशी दाबून ओक्साबोक्शी रडू लागला.

वास्तविक त्याच्या बाबतीत असं होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. परिक्षेचं जाऊ दे, गेल्या कित्येक महिन्यात अनन्यने कोणतीही गोष्ट मनापासून एन्जॉय केली नव्हती. सारखी एखादी अनामिक भिती त्याला लागून राहिलेली असे. गर्दीच्या ठिकाणी गेला म्हणजे 'लोकांना आपल्याबद्दल काय वाटते' याची तो सारखी चिंता करत असे. बरेचदा लोकांवर आपलं इम्प्रेशन पडावं म्हणून मुद्दाम मोठ्या आवाजात बोलणे, एखादा विनोद करून प्रतिक्रियांसाठी लोकांचे चेहरे न्याहाळणे असं तो वागत असे. काही चुकल्यासारखं वाटलं म्हणजे प्रचंड गोंधळून जात असे. एकटा असला म्हणजे नको नको ते वाईट विचार त्याच्या मनात येत. आपल्यासोबत काहीतरी वाईट घडणार याची चिंता त्याला लागून राहात असे. रात्री झोपेतून अचानक जाग येणं, छातीत धडधडणं, हातपाय कापणं असं अनन्यसोबत अनेकदा घडत असे. वैद्यकशास्त्राचा विद्यार्थी असल्याने आपल्यासोबत काय घडतंय याची अनन्यला अजिबातंच कल्पना नव्हती असं नव्हतं. ही 'अँक्झाईटी डिसॉर्डर' अर्थात 'चिंताविकारग्रस्तते'ची लक्षणं होती; पण ही गोष्ट इतरांसमोर मान्य करायला, उपचार घ्यायला अनन्य घाबरत होता. त्यातंही पुन्हा 'लोकांना काय वाटेल' हीच भिती त्याला सतावत होती.

'चिता दहति निर्जीवं चिन्ता दहति जीवितम् ।' असं एक संस्कृत वचन आहे. चिता निर्जीव(मृत) व्यतीला जाळते, तर चिंता जिवंत व्यक्तीला जाळते, असा त्याचा अर्थ ! मानवी मेंदू उत्क्रांत होताना, त्यासोबत अर्थातंच मानवी भावनांचाही विकास झाला. स्वत:च्या जिविताबाबतची चिंता-भिती यामुळे खरंतर रानावनात राहता राहता सुरक्षेचे नवे उपाय योजू लागला आणि रानटी जीवन सोडून जगू लागला. उद्या परिक्षा आहे, आपण नापास होऊ किंवा कमी गुण मिळतील ही भिती-चिंता आपल्याला खरंतर सकारात्मक काम करण्यासाठी उद्युक्त करत असते; पण एका मर्यादेपेक्षा अधिक चिंता जी दैनंदिन जीवनावर परिणाम करते तो मात्र एक 'विकार' मानून त्यावर उपचारांची गरज असते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या 'इंटरनॅशनल क्लासिफिकेशन अॉफ डिसीज' (ICD-10) नुसार अँक्झाईटी डिसॉर्डर्सचे 'F41' असे वर्गीकरण केले जाते. चिंता ही तात्पुरती, कायमस्वरूपी, ठराविक काळाने परतपरत उद्भवणारी असू शकते. एखाद्या गोष्टीची अति भिती वाटणे, सतत आपल्यावर एखादे संकट ओढवेल असे वाटणे, चिडचिड होणे, एकाग्रता कमी होणे,सदासर्वदा काल्पनिक विश्वात रमणे अशी अँक्झाईटीची विविध मानसिक लक्षणे विविध टप्प्यांवर दिसतात. छातीत धडधडणे, सारखे लघवी किंवा संडासला जावेसे वाटणे, कायम थकवा जाणवणे, सतत आळस किंवा निद्रानाश, दरदरून घाम येणे, दम लागणे, डोकेदुखी, छातीत दुखणे, हातपाय थरथरणे अशी शारिरीक लक्षणे दिसतात.

दैनंदिन जीवनातील ताण, स्पर्धात्मक वृत्ती, कामाची अनियमित वेळ यामुळे चिंताग्रस्ततेचे वाढते प्रमाण काळजी करण्यासारखे आहे. सतत तणावपूर्ण वातावरण, भिती हे जनरालाईज्ड अँक्झाईटी डिसॉर्डरला कारणीभूत ठरतात. लहानपणी पालकांच्या अति धाकाखाली राहिलेली मुलं मोठेपणी अँक्झाईटी डिसॉर्डरला बळी पडू शकतात. जगात दर तेरा माणसांमागे एका माणसाला अँक्झाईटी डिसॉर्डर असतो. आशियामध्ये हे प्रमाण ६% आहे.थायरॉईड हॉर्मोन्सची रक्तातली पातळी वाढणे, फिओक्रोमोसायटोमा, व्यसनाधीनता किंवा दारू अथवा झोपेची औषधे अचानक बंद करणे, रक्तातील साखरेची पातळी कमी होणे, हृदयाच्या गतीचे आजार (अरिदमिया) इ. आजारांमुळे अँक्झाईटीचे प्रमाण वाढू शकते.

एखाद्या गोष्टीबद्दलची सततची भिती, तणाव चिंताग्रस्ततेकडे वाटचाल करू लागतो. अति चिंताग्रस्तता कधी 'पॅनिक अटॅक्स'ना कारणीभूत ठरते. साधारण ४.७% लोकांना पॅनिक डिसॉर्डर हा विकार असतो. वरील उदाहरणात जे अनन्यसोबत घडलं ती लक्षणं पॅनिक अटॅक्समध्ये आणखी तीव्रतेनेही दिसू शकतात. पॅनिक अटॅक्स आल्यावर आपली चिंता आणि भिती यांच्यावर नियंत्रण ठेवायला शिकावं लागतं. औषधांचा त्यावर फारसा उपयोग होत नसल्याने कॉग्निटीव्ह बिहेविअरल थेरपी (सी.बी.टी.) हा एक उपचार उपलब्ध आहे. रुग्णांना रिलॅक्सेशनचं तंत्र शिकावावं लागतं. आपल्या समस्येविषयी समुपदेशकाशी बोलणं याला 'टॉक थेरपी' असं म्हणतात. योगासन, ध्यान, प्राणायाम याचाही अशा विकारांवर उपयोग होतो.

मेंदूतील गॅमा अमायनो ब्युटरिक अॅसिड (GABA) या रसायनाची पातळी कमी झाल्यास चिंताग्रस्तता, नैराश्य येऊ शकतं. 'गाबा' रसायनांची पातळी वाढवणारी औषधं या विकारांमध्ये देता येतात. आता अनेक नवीन गटांतील औषधेही या विकारांवरील उपायासाठी उपलब्ध आहेत.

पण या सगळ्या उपायांपेक्षाही आपल्या समस्यांविषयी पुढे येऊन जवळच्या व्यक्तींशी बोलणं आणि आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना त्यांच्या समस्येतून बाहेर यायला मदत करणं अधिक महत्वाचं असतं. चिंता किंवा नैराश्यग्रस्त व्यक्तींना तुमच्या सहानुभूतीची गरज नसते, गरज असते, ती 'हो, तू यावर मात करू शकतो !' हा विश्वास त्यांच्यात निर्माण करण्याची !

डॉ. सागर पाध्ये

Monday, 3 December 2018

रंग यांचा वेगळा !


रंग यांचा वेगळा !

सप्टेंबर २०१८, भारतात समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाली. त्यानंतर काहीकाळ पुन्हा यविषयी समाजात उलट-सुलट चर्चा झडल्या. इथे सामान्य व्यक्तींमध्ये निसर्गतः 'नॉर्मल' समजल्या जाणाऱ्या लैंगिक संबंधांबाबतंच प्रचंड गैरसमज असतात, तिथे या अशा विषयाबाबत काय बोलावे ? वास्तविक समलैंगिकता किंवा 'मधले असणं' हा विषय मानवी इतिहासाला नवीन नाही. बायबल, कुराण यांसारख्या धर्मग्रंथांत, हिंदू पुराणांत वा ग्रीक साहित्यात प्राचीन काळापासून कमी-अधिक फरकाने या विषयी उल्लेख सापडतात. यामागची पुरेशी कारणमीमांसा ठाऊक नसल्याने म्हणा किंवा बहुसंख्य समाजाच्या मनोधारणेच्या अगदी विरुद्ध असा हा प्रकार असल्याने काही धर्मांत त्याकडे पाप वा दोष म्हणून पाहिले गेले. धर्मशास्त्र काय म्हणते हा माझ्या लेखाचा विषय नाही. मी वैद्यकशास्त्रीय दृष्टिकोनातून याविषयी लिहिणार आहे.

समाजातील व्यक्तींची साधारणतः दोन प्रकारची लिंगं सांगितली जातात - स्त्री आणि पुरुष ! जन्माला येणारं बाळ कुठल्या लिंगाचं असेल, हे गुणसुत्रांवरून ठरतं. गुणसुत्रांपैकी 'लिंग गुणसुत्रे' (sex chromosomes) ही 'एक्स-एक्स' (XX) असतील, तर स्त्री व 'एक्स-वाय'(XY) अशी असतील, तर पुरुष. ही गुणसुत्रीय रचना गर्भधारणेच्या (Fertilization) वेळीच निश्चित झालेली असते. रचनाशास्त्राच्या दृष्टीने प्राथमिक लैंगिक अवयव (primary sexual organs - gonads) असल्याने वा नसल्याने लिंग ठरतं. वृष्ण (अंडकोष - testis) असतील तर पुरुष आणि अंडाशय (ovaries) असतील तर स्त्री.

सामान्यतः एखाद्या व्यक्तीच्या लैंगिकतेबाबत अनिश्चितता असेल किंवा ती व्यक्ती स्त्री आणि पुरुष अशा दोघांचेही गुणधर्म दाखवत असेल, तर त्याला सामान्य माणूस 'छक्का/हिजडा' म्हणतो.. पॉर्न इंडस्ट्रीत Shemale ही संकल्पना हॉर्मोनल थेरेपी/सर्जरी करून स्वत:ला स्त्रीचे गुणधर्म 'चिकटवून' घेणाऱ्या व्यक्तीबाबत वापरली जाते..

मातेच्या गर्भाशयात गर्भाची लैंगिक रचना कशी होते, ते थोडं विस्ताराने पाहू.

त्याआधी एक बेसिक कन्सेप्ट -
आपली 'डिफॉल्ट' लिंगविशिष्टता ही स्त्री-रुपाची असते !!

गर्भावस्थेत सहाव्या आठवड्यापर्यंत आपण सगळेच स्त्री रुपात असतो !!!!

समजा, गर्भाचं गुणसुत्रीय लिंग 'पुरुष' आहे, अर्थात लिंग गुणसुत्रं XY अशी आहेत; तर गर्भावस्थेच्या सहाव्या आठवड्यात अंडकोष (testes) बनू लागल्यावर पुरुष संप्रेरके (Androgens) स्त्रवली जातात आणि त्या प्रभावाखाली पुरुषी गुणधर्मांची वाढ होते. पुरुषांच्या पोटात बनणारे अंडकोष (testes) गर्भावस्थेच्या नवव्या महिन्यात शेवटी वृष्णात(scrotum) उतरवले जातात.

आता या हॉर्मोन्सच्या कामामध्ये काहीही बिघाड झाला की, बाळ जन्माला येतं तेव्हा स्त्रीरुपातंच दिसतं ! जेव्हा वयात आल्यानंतरही पाळी येत नाही, त्यावेळेस तपास केल्यावर कळतं -

१. स्त्री आहे पण स्त्रीप्रमाणे प्रजननसंस्थेची वाढ झालेलीच नाही.
२. पुरुष आहे, पण गर्भावस्थेत असल्यापासून लैंगिक अवयवांची वाढ झालीच नाही म्हणून बाहेरून स्त्रीसारखा दिसतो..

इन फॅक्ट या दुसऱ्या प्रकारात हे स्त्री सारखे दिसणारे पुरुष अधिक आकर्षक दिसतात, कारण यांच्या पुरुषी संप्रेरकांचं (androgens) मोठ्या प्रमाणात स्त्री-संप्रेरकात (estrogen) रुपांतर होत राहते आणि तितक्या चांगल्या प्रकारे स्त्रियांचे शारिरीक गुणधर्म यांच्यात डेव्हलप होत राहतात. (गुगल सर्च करा - Testicular feminization syndrome)

गुणसुत्रीय लिंग (XX किंवा XY) हे दोन आजारांत प्रामुख्याने बदलतं -
१. टर्नर सिंड्रोम (जनुकीय लिंग - XO)
गर्भात बाह्य जननेंद्रिये स्त्रीची असली तरी ओव्हरीज व गर्भाशय विकसित होत नाही.

२. क्लाईनफेल्टर (जनुकीय लिंग -XXY) - हिजडा
क्लाईनफेल्टर हे जन्मत:पुरुष दिसतात, पण बरेचदा काही रचनाशास्त्रीय विकृती दिसते. पुढे वयात आल्यावर आवश्यक ते बदल होत नाहीत.

इतर प्रकार -
३. अॅन्ड्रोजेन इन्सेन्सिटीव्ह सिंड्रोम -
अर्थात (पुरुषाच्या शरीरातील) पुरूष संप्रेरकांबद्दलची असंवेदनशीलता ! गर्भ पुरूषाचा असला, तरी पुरुषी जननेंद्रिये विकसित झालेली नसतात.

४. काहीवेळेस पुरुष संप्रेरकांची (मेल हॉर्मोन्स - अॅन्ड्रोजेन्स ) पातळी शरीरात खूप जास्त वाढते. पुरुष गर्भ असल्यास याने काही फरक पडत नाही; पण स्त्रीचा गर्भ असेल तर तिचं वागणं-बोलणं पुरुषी असू शकतं. वयात आल्यावर तिला स्त्रियांविषयी आकर्षण वाटू शकतं.

५. टेस्टोस्टेरॉन सारख्या पुरुष संप्रेरकांची पातळी पुरुष गर्भात कमी असल्यास पुरुष स्त्रीसारखा वागू लागतो. वयात आल्यावर त्याला पुरुषांचं आकर्षण वाटू लागतं.

कुठल्याही व्यक्तीची स्वतःच्या लिंगाबाबतची वैयक्तीक भावना (मी कोण आहे ?) म्हणजे 'जेन्डर आयडेन्टीटी' किंवा 'लिंगभावना'. अर्थात रचनाशास्त्रीयदृष्ट्या लिंग आणि मानशास्त्रीयदृष्ट्या स्वतःविषयीची लिंगभावना या दोन्हीही भिन्न गोष्टी आहेत. सामान्यत: बहुतांश पुरुषांना आपण पुरुष आहोत असंच वाटत असतं आणि स्त्रियांनाही आपण स्त्री आहोत असंच वाटत असतं. क्वचित काहींमध्ये ही 'लिंगभावना' वेगळी असू शकते. आपण अमुक एका लिंगाच्या व्यक्तीसारखे वाटत असलो, तरी आपण भिन्न आहोत ही भावना या व्यक्तींमध्ये प्रबळ असते. अशी ही वेगळेपणाची भावना आणि त्यामुळे येणारी अस्वस्थता वा खिन्नता म्हणजे 'जेन्डर डिसफोरीया' (Gender dysphoria). ज्या व्यक्तींना अशा पद्धतीने भिन्नलिंगी व्यक्ती म्हणून जगावं लागतं, त्यांना म्हणतात, 'ट्रान्सजेंडर्स', काही व्यक्ती आधुनिक वैद्यकशास्त्राची मदत घेऊन स्वतःच्या शरीरात असे बदलंही करून घेतात, त्यांना म्हणतात, 'ट्रान्ससेक्शुअल्स' !

कुठल्याही व्यक्तीची स्वतःच्या लिंगाबाबतची वैयक्तीक भावना (मी कोण आहे ?) म्हणजे 'जेन्डर आयडेन्टीटी' किंवा 'लिंगभावना'. अर्थात रचनाशास्त्रीयदृष्ट्या लिंग आणि मानशास्त्रीयदृष्ट्या स्वतःविषयीची लिंगभावना या दोन्हीही भिन्न गोष्टी आहेत. सामान्यत: बहुतांश पुरुषांना आपण पुरुष आहोत असंच वाटत असतं आणि स्त्रियांनाही आपण स्त्री आहोत असंच वाटत असतं. क्वचित काहींमध्ये ही 'लिंगभावना' वेगळी असू शकते. आपण अमुक एका लिंगाच्या व्यक्तीसारखे वाटत असलो, तरी आपण भिन्न आहोत ही भावना या व्यक्तींमध्ये प्रबळ असते. अशी ही वेगळेपणाची भावना आणि त्यामुळे येणारी अस्वस्थता वा खिन्नता म्हणजे 'जेन्डर डिसफोरीया' (Gender dysphoria). ज्या व्यक्तींना अशा पद्धतीने भिन्नलिंगी व्यक्ती म्हणून जगावं लागतं, त्यांना म्हणतात, 'ट्रान्सजेंडर्स', काही व्यक्ती आधुनिक वैद्यकशास्त्राची मदत घेऊन स्वतःच्या शरीरात असे बदलंही करून घेतात, त्यांना म्हणतात, 'ट्रान्ससेक्शुअल्स' ! अशा व्यक्तींचे लैंगिक वर्तनंही अर्थातंच भिन्न असते. शरीररचनेच्या दृष्टीने पाहता पुरुष असूनंही त्यांना पुरुषाविषयी आकर्षण वाटू शकते, अशा पुरुषांना 'गे' म्हणतात किंवा स्त्री असूनंही स्त्री विषयी आकर्षण असू शकते, अशा स्त्रियांंना 'लेस्बियन' म्हणतात. काही स्त्री व पुरूष दोघांशीही लैंगिक संबंध ठेवतात त्यांना 'बायसेक्शुअल' म्हणतात. अशा सर्व व्यक्तींसाठी एल. जी. बी. टी. (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर्स) नावाची चळवळ आहे.


                                                       (LGBT pride flag)

एखाद्या व्यक्तीची लिंगभावना वेगळी का असू शकते किंवा त्यास समलिंगी व्यक्तीविषयी का आकर्षण वाटू शकते, हे अजूनंही पुर्णपणे न उलगडलेलं कोडं आहे. जनुकीय अभ्यासातून समलिंगी संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींमध्ये काही जनुकीय साधर्म्ये आढळतात; पण अमुक एक जनुक यासाठी जबाबदार असतं हे ठामपणे सांगता येत नाही. नैसर्गिक विरुद्धलिंगी संबंध ठेवणाऱ्या पालकांनी वाढवलेली मुलं समलिंगी असू शकतात किंवा समलिंगी पालकांनी वाढवलेली मुलं विरुद्धलिंगी असू शकतात. एक मात्रं नक्की कोणत्याही उपचारांनी लिंगभावना वा लैंगिक आकर्षणाची भावना बदलता येते असं नाही. ती निसर्गत:च जशी असते तशी असते. पुरुष वा स्त्री संप्रेरकांच्या कमी-जास्त प्रभावातून व्यक्तीच्या सामान्य किंवा लैंगिक वर्तनात बदल होऊ शकतो ( उदा. प्रणयाच्या वेळी आक्रमक होणे, प्रियकरास प्रतिसाद देणे इ.); परंतू त्यामुळे समलैंगिक आकर्षण निर्माण होऊ शकते, असे ठामपणे सांगता येत नाही(Alfred kinsey 1941).

सोप्या मराठीत ही माहिती अच्युत गोडबोल व नीलांबरी जोशी लिखित 'मनकल्लोळ' या पुस्तकातंही वाचता येईल.

मादक द्रव्यांचे अतिसेवन, काही मनोविकार यातून काही व्यक्ती अनैसर्गिक लैंगिक संबंध वा समलैंगिक संबंध यासाठी प्रवृत्त होतात, वेश्याव्यवसायांत काही जबरदस्तीने यात ओढले जातात; या गोष्टी खऱ्या असल्या, तरी आधी जे प्रकार सांगितले त्यांतली मुळची लिंगभावना बदलता येत नाही. किंबहुना शास्त्रज्ञही त्याकडे मनोविकार म्हणून न पाहता नैसर्गिक भावना म्हणूनंच पाहतात.

आल्फ्रेड किन्से यांनी पहिल्यांदा १९४८ साली Sexual behavior in the human male या नावाने हे पुस्तक लिहिलं. १९४९ सालची या पुस्तकाची आवृत्ती Archive.org वर पीडीएफ स्वरुपात उपलब्ध आहे. त्यानंतर आल्फ्रेड किन्से यांनी Sexual behavior in the human female या नावानेही पुस्तक लिहिलं. या पुस्तकांमुळे त्याकाळी बरीच खळबळ माजली होती. या पुस्तकांत समलैंगितेवरंही स्वतंत्र प्रकरणं आहेत. त्यात किन्से यांनी बरेच सांख्यिकीय निष्कर्ष मांडले आहेत. अर्थात बरेचदा व्यक्ती आपली अशी वैयक्तीक माहिती मुक्तपणे उघड करतातंच असं नाही; त्यामुळे या आकडेवारीस मर्यादा येतात. पण किन्से यांनी काही निष्कर्ष मांडले त्यानुसार पौगंडावस्थेत समलैंगिक संबंधांचा अनुभव घेतलेल्या व्यक्तींत वाढत्या वयानुसार दर आठवड्यास असे संबंध ठेवण्याचे प्रमाण वाढत जाते. शिवाय ग्रामीण भागात शहरी भागापेक्षा समलैंगिक संबंधांचे प्रमाण कमी असते. महाविद्यालयीन मुलांमध्ये मात्र अशी शहरी-ग्रामीण तफावत आढळत नाही. चर्चमध्ये जाणाऱ्या वा धार्मिक वृत्तीच्या मुलांमध्ये समलैंगिक संबंधाचे प्रमाण कमी असते, असेही किन्से यांनी म्हटले आहे (Sexual behavior in the human male,1949 page no. 636). धार्मिक वृत्तीच्या व्यक्तींमध्ये पाप लागण्याच्या भितीनेही हे प्रमाण कमी असू शकतं.

आतापर्यंत इतकं वाचल्यावर अनेकांची भावना, 'असू दे ना मग; मला काय त्याचे ?' अशी असू शकते; किंवा मग अशा गोष्टी अजून कायदेशीर करून, त्याबद्दल बोलून-लिहून प्रोत्साहन का द्यावे, असंही कोणी म्हणेल. विषयाचे गांभीर्य व त्यातील तथ्य कळावे याच उद्देशाने मी ही माहिती दिली. एकदा समलैंगिकता हा कुठलाही आजार नाही किंवा काही अपवाद वगळता या नैसर्गिक निवडीत काही बदलंही करता येत नाहीत, हे लक्षात आल्यावर समाजात या व्यक्तींना व त्यांच्या भावनांना स्विकारणे अतिशय गरजेचे आहे. https://www.ncbi.nlm.nih.gov या अमेरिकन वेबसाईटवर याविषयासंदर्भात केलेले अनेक अभ्यास, सांख्यिकीय माहिती उपलब्ध आहे. त्यातील एका इ. स. २००० मध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रबंधातील काही निष्कर्ष इथे थोडक्यात देतो -

१. साधारणतः एकूण लोकसंख्येच्या १०% लोकसंख्या ही लेस्बियन, गे, बायसेक्शुअल किंवा ट्रान्सजेंडर प्रकारात मोडते.
२. साधारणतः दोन तृतीयांश डॉक्टरंच आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांच्या लैंगिक निवडी विचारात घेत नाहीत.
३. उपरोल्लेखित चार प्रकारांत मोडणाऱ्या व्यक्तींपैकी सुमारे ४०%व्यक्ती एकदा तरी आत्महत्येचा प्रयत्न करतात.
४. Secretary of the Department of Health and Human Services, Task Force on Youth Suicide in 1989 च्या रिपोर्ट नुसार एकूण आत्महत्यांपैकी ३०% आत्महत्या या अशा व्यक्तींकडून होतात.
५. अशा व्यक्तींपैकी जवळपास ९५% व्यक्ती या समाज, मित्रमंडळी यांच्यापासून वेगळ्या पडलेल्या असतात.
६. यांपैकी किमान २०% लोकांचा मानसिक वा शारिरीक छळ झालेला असतो.
७. अशा मुलांमध्ये शाळा सोडण्याचे प्रमाण पाचपट अधिक असते.
८. यांच्यापैकी किमान ६०% व्यक्ती कुठल्यातरी मादक द्रव्याच्या आहारी गेलेले असतात. इंजेक्शन्स वापरून मादक द्रव्ये टोचून घेण्याचे प्रमाण नऊपट अधिक असते.
९. घरच्यांनी घराबाहेर काढली गेलेली ही मुलं बरेचदा अनाथाश्रामातंही स्विकारली जात नाहीत. ती रस्त्यावर राहतात. इच्छेने वा जबरदस्तीने वेश्याव्यसायात येतात. गुप्तरोगांचे प्रमाण त्यांच्यामध्ये लक्षणीयरित्या जास्त असते.
१०. शिक्षण आणि समुपदेशनाच्या अभावी सुमारे ८०% गे व्यक्तींना कॉन्डम कसे वापरावेत हेसुद्धा माहित नसतं !

वरील निष्कर्ष पाहता या व्यक्तींना समाजात स्विकारुन त्यांचे हक्क, त्यांचे सन्मान त्यांना परत देणे; किती गरजेचे आहे हे लक्षात येईल !

समलैंगिक संबंधांसोबत आणखी एक विषय ओघानेच येतो, तो म्हणजे अनैसर्गिक लैंगिक संबंध ! वास्तविक लैंगिक संबंधांमागे निसर्गाचा एकंच उद्देश असतो, प्रजनन ! त्या उद्देशानुसार पुरुषाचं वीर्य स्त्रीच्या योनीमार्गाद्वारे अंडपेशीपर्यंत जाणं महत्वाचं ! पण अशा लैंगिक संबंधांना मुळातुनंच प्रेरणा मिळावी, यादृष्टीने निसर्गाने शरीराची रचना केलेली असते. प्रजननक्षम वयात पुन्हापुन्हा लैंगिक इच्छा जागृत होणं आणि या संबंधातून आनंद मिळणं ही यादृष्टीने झालेली नैसर्गिक रचना आहे. नाहीतर कोण कशाला लैंगिक संबंधांना पुढाकार घेईल ? मानव हा वर्षभर जननक्षम असणारा प्राणी आहे. साहजिकंच त्याची लैंगिक क्षुधाही वर्षभर टिकून असते. त्यामुळे लैंगिकता ही गोष्ट केवळ प्रजननापुरता मर्यादित राहत नाही. लैंगिक संबंधांतून मिळणारा आनंद हा शरीराच्या एका अतिशय जटिल रचनेचा परिपाक आहे. त्यामध्ये असे काटेकोर नियम नसतात. बंद दाराआड कोणाला काय हवं असतं याचेही नियम नसतात. मुळात लैंगिक आवडी निवडी या थेट वर्गीकरण करता येण्याजोग्या दोन ध्रुवांवरच्या गोष्टी नाहीत. त्याचा एक 'स्पेक्ट्रम' असतो. सगळे त्या स्पेक्ट्रमच्या अधेमधे कुठेतरी येतात. हा स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. पण तुर्तास इतकं सांगतो, की सदासर्वदा या किंचित वेगळ्या आवडी-निवडी म्हणजे विकार नसतात. खाण्या-पिण्याच्या वगळून वगैरे जशा वेगवेगळ्या आवडी-निवडी असतात, तशाच याही ! एका मर्यादेपर्यंत वैद्यकशास्त्रंही त्याकडे विकार म्हणून पाहत नाही.

अर्थात ज्या अवयवांची रचना लैंगिक संबंधासाठी झाली आहे, ते सोडून अन्य वस्तू वा अवयव लैंगिक सुखासाठी वापरणे, यातून काही आरोग्यविषयक समस्या निर्माण होतातंच. शरीराला इजा होणे, गुप्तरोगांचे व पर्यायाने कर्करोगासारख्या आजारांचे प्रमाणंही अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवणाऱ्यांमध्ये अधिक दिसते. अनेकांना आता यातून दिवस जाणार नाहीत, त्यामुळे कॉन्डम्स वगैरेचा अडसर कशाला असेही वाटते. वास्तविक एचआयव्ही व गुप्तरोगांपासून बचाव हासुद्धा कॉन्डमचा एक उपाय आहेच !

आजवर अनेकांनी मला कुजबुजत्या स्वरात 'हे योग्य की अयोग्य' असा प्रश्न केला आहे. यात योग्य-अयोग्य, पाप-पुण्य काहीही नाही. जोडीदाराच्या भावनांचा आदर, पुरेशी स्वच्छता व आरोग्यविषयक आवश्यक ती काळजी घेणे इथे अपेक्षित असते. त्यासाठी शिक्षण आणि समुपदेशन हवे. त्या व्यक्तीनेही याबद्दलची अपराधी भावना सोडून पुढे येऊन बोलणे आणि जो पुढे येऊन बोलतोय त्याला सर्वांनी स्विकारणे फार गरजेचे आहे !

डॉ. सागर पाध्ये

Sunday, 9 September 2018

इव्होल्यूशनचं इव्यॅल्यूएशन

२४ नोव्हेंबर १८५९, चार्ल्स डार्विनचं 'द ओरिजीन ऑफ स्पिशीज्' पुस्तक प्रकाशित झालं आणि विज्ञान जगतात एकंच खळबळ उडाली. डार्विनने सजीवसृष्टीच्या विकासाची मांडलेली संकल्पनाच तशी होती, 'एकपेशीय सजीवांपासून सुरुवात होऊन आजची बहुपेशीय, जटिल संरचनेच्या सजीवसृष्टीची क्रमाक्रमाने रचना झाली';  ही कल्पनाशक्तीची अफाट झेप होती. कुठे ते एकपेशीय सुक्ष्मजीव, कुठे लहानसे किडे-किटक, वनस्पती नी सिंहासारखे अक्राळविक्राळ प्राणी आणि कुठे आजचा बुद्धिमान मानव.... आणि या सर्वांचा उगम एकाच प्रकारच्या सजीवांतून क्रमाक्रमाने झाला म्हणायचा ? छे छे... कसं मान्य करायचं राव ? हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन कोणीही असो; कुठल्याही धर्मातील तत्वज्ञानात असा काही उल्लेख नव्हता, उलट ईश्वराने कशी एकाच क्षणी सकलसंपन्न सजीवसृष्टी निर्माण करुन,  धर्मग्रंथ मानवाचे हाती देऊन माणसाला धर्माची शिकवण दिली आणि आमचाच धर्म नी धर्मग्रंथ कसे साक्षात ईश्वरी आहेत हे पटवून देण्यासाठी लोक एकमेकांच्या उरावर बसत होते. कुठे धर्मांध-श्रद्धाळू लोक, तर कुठे जिज्ञासू वैज्ञानिक सर्वांनी डार्विन वेगवेगळ्या दृष्टीकोनातून अभ्यासला. कोणी डार्विनवर जोरदार टिका केली, कोणी डार्विनच्या उत्क्रांतीवादातले खाचखळगे दाखवून पुढे चाचपणी करत निघाले. नास्तिकमतवाद्यांनी तर डार्विनचे आंधळे कोडकौतुक आरंभले, धर्मसंस्थांनी डार्विन कसा चुकीचा आहे, हे दाखवण्यासाठी हजारो पानांचे ग्रंथ खर्ची घातले. वैज्ञानिकांनी सजीवसृष्टीविकासाच्या इतरही कल्पना मांडल्या, त्यातून भिन्न मताचा म्हणून डार्विनवर टिकाही केली. दशकांमागून दशके उलटत गेली, नवीन संशोधन, अभ्यास यातून समोर येणारे निष्कर्ष  हळूहळू उत्क्रांतीवादाचीच पुष्टी करणारे मिळू लागले.
आज दिडशे वर्षांनंतर शास्त्रज्ञांनी विविध प्रयोगांच्या निष्कर्षावरुन आणि उपलब्ध जीवाश्म पुराव्यांवरून उत्क्रांतीवादावर शंका घेणे सोडून दिले आहे. उलट सजीवउत्क्रांतीशी निगडीत विविध ज्ञानशाखा आज जीवशास्त्रात निर्माण होत आहेत, वैद्यकीयशास्त्रात नवनवीन भर पडत आहे. कशी का होईना पण सजीवसृष्टीची सुरुवात एकपेशीय सजीवांपासूनच होऊन त्यांचा आजवर विकास होत आला आहे, हे आता वैज्ञानिक तथ्य आहे.

तरीही उत्क्रांती म्हणजे नक्की काय किंवा उत्क्रांतीवादावर इतरंही विविध शंका मला विचारल्या गेल्या, ती सर्व प्रश्नोत्तरे मी इथे संकलित करुन मांडत आहे, अनेकांच्या शंकांचे यामुळे समाधान होईल असे वाटते. कोणाला कदाचित हा लेख सलग वाटणार नाही; कोणाला काही विधानं मांडलेली पटणार नाहीत, मात्र मी सलग लेख लिहिण्याच्या उद्देशाने सदर लेखन केलेले नाही, ही विविध ठिकाणी वेळोवेळी झालेली चर्चाच संकलित केली आहे. कदाचित यावर नवीन प्रश्न उपस्थित होतील, त्यातून या लेखात अजून भर पडेल. तेव्हा सर्व शंकांचे व मतांचे स्वागतंच आहे


१.  प्रश्न - सजीव प्रतिकूल परिस्थितीत स्वतःमध्ये बदल घडवून आणतात व आपले अस्तित्व टिकवून ठेवतात, असे आपण म्हणता; 'सर्व्हायवल अॉफ द फिटेस्ट' असे उत्क्रांतीवादाचे समर्थक म्हणतात. मग जर जलचरांपासून उभयचर, भुचर अशी सजीवसृष्टी विकसित होत राहिली, तर लहान माशांसारखे जलचर आजवर टिकून कसे राहिले ? मग 'सर्व्हायवल अॉफ द फिटेस्ट' (जो सक्षम असेल तोच टिकून राहिल.) हे चुकीचे विधान नाही का ?

उत्तर-
खरंतर हे विधान मुळचे डार्विनचे नाही,हे विधान डार्विनचा सिद्धांत वाचून स्पेन्सर नावाच्या कोण्या व्यक्तीने केले,डार्विनने विशेष विचार न करता ते उचलून धरले;पण मुळात आपण म्हणता त्याप्रमाणे हे विधान अर्थहीन आहे.शास्त्रज्ञांनीही अर्थातच हे विधान वापरायचे बंद केले आहे.

त्याऐवजी 'प्राकृतिक निवड' (Natural selection) ही अधिक योग्य व्याख्या आहे.या आधुनिक व्याख्येनुसार -
स्वजातीचे अस्तित्व टिकवणे म्हणजे फक्त श्रेष्ठ जातीनेच टिकून राहणे किंवा आस्तित्वाच्या लढाईत इतर जातींविरूद्ध जिंकणे नव्हे तर भवतालच्या परिसरात मोठी उलथापालथ होत असताना (dramatic changes in environmental conditions) स्वतःस टिकवून ठेवणे.

आपल्यातली सारी जीवशास्त्रीय गुण-वैशिष्ट्ये ही आपल्या गुणसुत्रांवर अवलंबून असतात. गुणसूत्रे म्हणजे थोडक्यात पेशींच्या केंद्रकातील डिएनएच्या लांबलचक साखळ्यांचा एक गुंता ! गुणसूत्रे आपल्याला आपल्या आई-वडिलांकडून मिळत असतात. या डिएनएच्या रेणूचा एक छोटासा भाग म्हणजे जनुक (जीन - gene). या जनुकांमध्ये जे बदल होतात, त्याला म्हणतात 'म्युटेशन' (mutation). अशा पद्धतीने जनुके बदलली की गुणवैशिष्ट्ये बदलतात आणि ही जनुके पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित झाली, की नव्या गुणवैशिष्ट्यांसहीत ही नवी पिढी आणि त्यापुढील सर्व पिढ्या जन्माला येत राहतात. याचे अगदी सोपे उदाहरण 'अँटीबायोटीक रेझिस्टन्स' ! अर्थात आजार निर्माण करणाऱ्या सुक्ष्मजीवांच्या नवीन पिढ्यांनी स्वतःमध्ये बदल घडवल्याने त्यांच्यावर काही जुन्या प्रतिजैविक औषधांचा (antibiotics) आता परिणाम होत नाही; हे आजवर टिव्हीवर बातम्यांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये वा आपल्या डॉक्टरांकडून आपण ऐकलेच असेल. (प्रतिजैविकांचा अतिवापर टाळावा, तो यासाठीच !)

ही उत्क्रांती दोन प्रकारात विभागता येईल. मायक्रोइवोल्यून (microevolution)- सूक्ष्म बदल आणि मॅक्रोइव्होल्यूशन (macroevolution)-मोठे बदल. ड्रग रझिस्टन्ट बॅक्टेरीया,मलेरियाप्रवण भागातील ( अफ्रीका) माणसांच्या रक्ताच्या १५-२०%% लाल पेशींच्या आकारात बदल [नाॅर्मल लाल रक्तपेशी चकतीच्या आकाराच्या असतात,ज्यामध्ये मलेरियाचे पॅरासाइट्स राहू शकतात, म्यूटेशनने या रक्तपेशी कोयत्याच्या आकारात (sickle cell) बदलतात,ज्यामध्ये मलेरियाच्या परजीवींना राहता येत नाही.] असे अनेक बदल स्पष्ट दिसतात,ते नाकारण्यात अर्थ नाही,असेच छोटे मोठे जनुकीय बदल मोठ्या काळात संपूर्ण 'जीन पूल' मध्ये बदल घडवून आणतात, ज्याला मॅक्रोइव्होल्यूशन म्हणतात, उदा. ट्रीओडल या उडत्या डायनोसोरमध्ये उत्क्रांती होत पिसं येणे.

जर काही सजीवांचा विकास होऊन भिन्न प्रजाती बनतात, तर मुळच्या जुन्या प्रजाती नष्ट का होत नाहीत ? किंवा या जुन्या प्रजातींमध्ये उत्क्रांती होऊन आता नवीन प्रजाती बनताना का दिसत नाही हा या प्रश्नाचा उपप्रश्न आहे, त्याचे उत्तर असे -

'सर्वहायव्हल अॉफ द फिटेस्ट' हे विधान शुद्ध वैज्ञानिक नाही. प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली असताना ज्यांनी स्वतःमध्ये बदल केला, तेच सजीव इतर सजीवांच्या तुलनेत टिकून राहिले. याचा अर्थ सदासर्वकाळ सर्व परिस्थितींत हेच सजीव टिकून राहतील, असा घ्यायचा नसतो. या कालबाह्य विधानाला घट्ट पकडून ठेवल्याने ही गोची झाली आहे.इथे प्रश्न आहे प्राकृतिक निवडीचा. अचानक आलेल्या प्रतिकूल परिस्थितीत जे टिकले, ते उरले बाकी गेले.(अचानक आलेली परिस्थिती म्हणजे सहा-महिने वर्षाचा काळ नव्हे)
आजवर पृथ्वीवर असलेल्या एकूण प्रजातींपैकी ९९% प्रजाती पूर्णतः नष्ट झाल्या आहेत, होणाऱ्या बदलांना त्या तोंड देऊ शकल्या नाहीत.

जलचर,सरिसृप,सस्तन प्राणी यांनी स्वतःमध्ये बदल घडवून,अनुकूल परिस्थितीत जाऊन स्वतःला टिकवले आहे. उदा. एका भूभागात पाण्यात राहणे विशिष्ट परिस्थितीत अशक्य झाल्यावर जमिनीवर येण्याचा यशस्वी प्रयत्न केला गेला.कारण जमिनीवर तेव्हा अनुकूल परिस्थिती होती;
पण ही घटना म्हणजे एकाच वेळी संपूर्ण पृथ्वीवर घडली आणि सर्व मासे जमिनीवर एकदम धावायला लागले असं नाही.जिथे जेवढ्या काळापुरता जशी गरज लागली,तिथे तसे बदल घडत गेले,सजीवसृष्टी पसरत गेली,स्वतःचे अस्तित्व टिकवत राहिली. (opportunistic expansion into empty ecological niche)

सजीवांमध्ये जनुकीय बदल घडतच असतात(चांगले किंवा वाईट), जे बदल अस्तित्व टिकवण्यास मदत करतात,ते पुढच्या पिढ्यांमध्ये प्रजननातून संक्रमित होत रहातात, छोट्याछोट्या बदलांतून मोठे बदल घडतात, हे मात्र प्रायोगिक तत्वावर सिद्ध झालेले आहे.

२. प्रश्न - सर्व सजीवांमध्ये केवळ माणसाचाच मेंदू इतका प्रगत व तल्लख कसा ?

उत्तर - हा प्रश्न जिराफाचीच मान इतकी लांब का, हत्तीचेच नाक इतके मोठे असे का; याप्रकारचा आहे. प्रत्येक सजीव प्रजातीकडे स्वतःचे असे खास वैशिष्ट्य आहे, ज्याद्वारे ते आपले अस्तित्व टिकवून धरतात. राहता राहिला मेंदूचा प्रश्न तर,
मेंदूच्या विकासाचे तीन टप्पे आढळतात.
i.अॅर्कीकोर्टेक्स (Archicortex)
ii.पॅलिओकाॅर्टेक्स (Paleocortex)
iii.निओकाॅर्टेक्स (Neocortex)

यापैकी निओकार्टेक्स सध्या सर्वाधिक प्रगत तर अॅर्कीकाॅर्टेक्स सर्वात अप्रगत आहे.हे तिन्हीही टप्पे विविध सजीवांमध्ये आढळतात.यापैकी मनुष्याच्या मेंदूचा सर्वाधिक म्हणजे ९०% भाग निओकाॅर्टेक्सने व्यापला आहे,म्हणून तो हुशार,तरी इतर दोन टप्प्यांतील मेंदूही मानवात असतो,तसा निओकाॅर्टेक्स इतर जीवांतही कमी अधिक आढळतो,त्यामुळे एकटा मानव हुशार आणि बाकी सारे एकजात निर्बुद्ध अशी विभागणी नाही करता येत.ज्या प्रतिकुल परिस्थितीने 'एका भुभागातील' एप्स ना झाडावरून जमिनीवर आणले,त्याच परिस्थितीने अस्तित्वाच्या लढाईत मेंदूचा वापर करण्यास शिकवले. (Natural selection and opportunistic expansion in empty ecological niche !!!)

३. उत्क्रांती सिद्ध करण्याइतपत भुतकाळातील जीवाश्म पुरेसे मिळालेले नाहीत.

उत्तर-
नुसते आजवर मिळालेले मानवी जीवाश्मंच सुमार सहा हजार आहेत. इतर सजीवांचे मिळून लाखो जीवाश्म आपल्या हाती लागले आहेत. हा आकडा थोडा-थोडका नव्हे. हे जीवाश्म उत्क्रांतीचे मधले टप्पे दाखवतात.

४. प्रश्न - उत्क्रांतीचे वर्तमानाकाळात काहीच पुरावे मिळत नाहीत का ?

उत्तर-
नाही, असं काही नाही. आता मी काही वैज्ञानिक तथ्ये सांगतो. त्याव्यतिरिक्तही पुढे काही बाबी सांगणार आहेच -
आता प्रायोगिक अभ्यासातून सिद्ध झालेल्या (तर्कावर मांडलेल्या नव्हेत) गोष्टी -

#.सर्व सजीवांमध्ये जवळपास साडेतीनशे जनुके एकमेकांशी साम्य दाखवतात.

#.अगदी उंदरासारख्या प्राण्यांशीही माणूस जनुकीय पातळीवर ९०% साम्य दाखवतो.

#.जनुकीय अभ्यासावरून सर्व मानवजात ही अफ्रिकेतूनंच पसरली हे सिद्ध आहे; किंवा मनुष्याची/ सर्व सजीवांची निर्मिती एकाच ठिकाणी कुठे झाली असे मानले; तरी आज विविध खंडांत राहणाऱ्या मानव जातीतच नव्हे तर सर्व जीवमात्रांत तेथील पर्यावरणाला अनुसरून बदल कसे झाले ?

#.शरिरातील उर्जाकेंद्र-मायटोकाॅन्ड्रीआॅन या पेशीतील अवयवाकडे चक्क स्वतःचा डिएनए असतो.(प्रत्येक पेशीत केंद्रकात डिएनए असतो, पेशीतील इतर अवयवांमध्ये नाही)
या मायटोकाॅन्ड्रीआचा अभ्यास केल्यावर त्याचे रिकेट्सीआ या प्रोकॅर्योट बॅक्टेरिआशी साधर्म्य दिसतं. हे प्रयोगातून सिद्ध झालेलं आहे. हे अनेक पेशी एकत्र येऊन सुसूत्रतेने काम करू लागल्याचं उदाहरण आहे
निसर्गात अशी असंख्य उदाहरणे आहेत.माझ्या आतड्यातील जीवाणू मला अन्न पचवण्यास मदत करतात,त्याबदल्यात मी त्यांना हव्या त्या स्वरूपात पोषण देतो.पण त्यासाठी आम्ही दोघांनी एकत्र बसून एकमेकांचे प्रस्ताव मांडून चर्चा केली नव्हती.मेंदू नाही म्हणून सहजीवन अशक्य असे म्हणता येत नाही.


उत्क्रांतीवादाच्या विरोधकांनी पुढील प्रश्नांची उत्तरे द्यावीत -

१. आपल्या कंबरेचे हाड ज्याला 'पेल्व्हीस' म्हणतात ते वॉशबेसिनच्या आकाराचे असते. (पेल्व्हीस या शब्दाचा अर्थंच 'बेसिन' होतो) आता या बेसिनच्या वरच्या रुंद भागात मुत्राशय, गर्भाशय(स्त्रियांमध्ये), आतडे व गुदाशय 'ठेवलेले' आहेत. तर खालच्या अरुंद भोकातून गुदाशयाचा खालचा भाग,योनी व मुत्रनलिका बाहेर काढून त्यांना स्वतंत्र द्वारं (openings) दिले आहेत.

एक मानव वगळता अन्य कोणीही प्राणी पुर्णपणे दोन पायांवर ताठ उभा राहून चालू शकत नाही. त्यामुळे हे पेल्व्हीस माणसात किंचित तिरपे आणि छोटे असते. याउलट इतर चतुष्पाद व चिंपाझीसारख्या प्राण्यांमध्ये ते तुलनात्मक दृष्ट्या मोठे असते. याउलट माणसांमध्ये जन्माला येणाऱ्या बाळाचे डोके तुलनेने बरेच मोठे असते. उदाहरणासाठी व तुलनेसाठी मी सोबत एक फोटो जोडत आहे. खाली बाजू-बाजूला चिंपांझी व मनुष्याचे पेल्व्हीस व त्यामध्ये त्यांच्या बाळांच्या कवटीचे चित्र आहे. बाहेरची आउटलाईन म्हणजे पेल्व्हीस व आतमध्ये दाखवलेली अंडाकृती आकृती म्हणजे बाळाची कवटी, हे वरतून पाहिल्यावर दिसणारे चित्र आहे. (म्हणजे बेसिनच्या बरोबर वर लावलेल्या नळाला बेसिन जसं दिसत असेेल तसं तुम्हाला आता पेल्व्हीस दिसतंय) बाळाची कवटी व पेल्व्हीस यांमधील काळा  रंग रिकामी जागा दाखवतो. आता नीट निरीक्षण करा, चिंपाझीच्या (p. troglodytes) पेल्व्हीसची 'आउटलेट' आणि बाळाची कवटी या दोहोंमध्ये बरीच जागा शिल्लक राहते, तर मानवी बाळाची कवटी आईच्या पेल्व्हीसमध्ये जेमतेम मावते, मोकळी जागा अशी दिसतंच नाही. अजून अतिशय महत्वाचा भाग सांगतो; कवटीवर जी मार्कींग दिसत आहे, त्यावरुन व्यवस्थित निरीक्षण केलं तर लक्षात येईल चिंपाझीचं बाळ सरळ चटकन बाहेर निघते, तर मानवी बाळ अगदी वरपासून (इनलेट मग मिडप्लेन आणि मग आउटलेट) कसबसं प्रत्येक वेळी  स्वत:भोवती फिरत खाली येतंय. (वैद्यकीय भाषेत या बाळाच्या स्वत:भोवती फिरत बाहेर येण्यालाच 'मेकॅनिजम अॉफ लेबर' असं म्हणतात; असा प्रकार केवळ मानवातंच दिसतो.) आता एक शेवटचं उदाहरण देतो. समजा, एक सात इंच व्यासाचं भोक पाडलं, तर त्यातून क्रिकेटचा बॉल काढणं सोपं की फुटबॉल काढणं सोपं असेल ? या उदाहरणात फुटबॉल अशा भोकाच्या आरपार काढणं किती जिकरीचं काम असू शकेल लक्षात येतंय का ? पेल्व्हीसमध्ये जेमतेम मावणारं बाळ अशा अरुंद जागेत स्वत:भोवतीच फिरवत बाहेर काढणं असंच जिकरीचं काम असतं !!



हे असं असूनसुद्धा माणसामध्ये इतर प्राण्यांसारखी अगदी सहज प्रसुती होते, असं आपल्याला वाटत असेल तर तो आपला गैरसमज आणि अज्ञान आहे.


माझा प्रश्न हाच आहे.. माणसाच्या शरीररचनेत ही अशी चूक कशी झाली ? निर्मितीच्या वेळेसंच अचूक शरीररचना प्राप्त का झाली नाही ? प्रश्न हा वेदना वा दु:ख सहन करण्याचा नाहीच, प्रश्न हा आहे, की शरीर बनताना त्यात अशा त्रुटी का राहिल्या ? कोणी म्हणेल मानव हा श्रेष्ठ प्राणी आहे म्हणून किंवा कर्माचे फळ म्हणून ! तर ईश्वर कर्माचे फळ देण्यासाठी स्वत:ची रचना जाणुनबुजून दोषपुर्ण बनवेल का ?

कोणी म्हणेल, आधुनिकीकरणामुळे अलीकडे प्रसुती गुंतागुंतीची होते. मधुमेह,लठ्ठपणा यांचे वाढते प्रमाण या अनुषंगाने चिंताजनक आहे खरे; पण आपण म्हणता त्या दृष्टीने नव्हे ! कोणाला वाटते श्रमाची कामे करणाऱ्या स्त्रियांची प्रसुती सदासर्वकाळ सोपी होते.

मग आता आपण तुमच्या-माझ्या किंवा अन्य कोणाच्या वैयक्तीक अनुभवांपेक्षा जागतिक आरोग्यसंघटनेचे (WHO) आकडे काय म्हणतात पाहू.

-दररोज जगभरात ८३० माता या प्रसुतीवेळी दगावतात.

- यापैकी ९९% मातामृत्यू हे विकसनशील देशांत होतात.

- १९९० ते २०१५ मातामृत्यूदर हे ४४टक्क्यांनी कमी झाले आहेत.


आता मला सांगा,

i.एक नैसर्गिक प्रक्रीया इतकी जीवावर का ओढवली जाते?

ii.हे आधुनिकीकरणाचे परिणाम म्हणावेत तर आधुनिक देशांऐवजी हे प्रमाण विकसनशील देशात अधिक का ?

iii. १९९० पासून जसेजसे आधुनिकीकरण वाढत गेले तसेतसे मातामृत्यूचे प्रमाण कमी का होत गेले ?


प्रश्न मानवी जन्माशी निगडीत असल्याने इथे विचारवंताना,तत्वज्ञान सांगणाऱ्यांना पुष्कळंच वाव आहे, त्यामुळे याव्यतिरिक्त काही क्षुल्लक रचनांमधल्या चुका आता पुढे सांगतो.


२. हे दुसरे उदाहरण -

अक्कलदाढ

वय वर्ष १७ ते २५ याकाळात येणारी दाढ..


अनेकांना ती येताना प्रचंड दुखतं, दंतवैद्यांना या दाढेसाठी हस्तक्षेप करुन कधी या दाढेसाठी जागा करावी लागते; कोणाची दाढ येतानाच काढून टाकावी लागते.


का माहितेय ?


एक विचित्र गडबड झाली आहे.. इतर प्राण्यांप्रमाणे आपल्याला जास्तीचा दात तर आहे पण त्यामानाने मानवी जबडा मात्र लहानंच आहे* त्यामुळे कोणाकोणाला दात येताना प्रचंड दुखतं, कोणाचा दातंच काढावा लागतो, कोणाचा दात आयुष्यभर जबड्याच्या हाडातंच राहतो.. अलीकडे सुमारे ३५-४०% लोकसंख्येत आता अक्कलदाढं बनतंच नाही (अजेनेसीस) , त्यातही हे बदल दिसणारे लोक जनुकियदृष्ट्या एकमेकांशी संबंधित आहेत असं दिसतं..


सांगा आता,

सर्वज्ञानी निर्माता मनुष्य निर्माण करत असताना जबड्यात मावणार नाहीत, कधी आपलं कार्य बजाविण्यासाठी पुर्ण बाहेरच येऊ शकणार नाहीत, वा कधी प्रचंड वेदना होतील इतके दात देईल का ? जर हा दोष नव्हता, यापासून काही अपाय नव्हता असे आपल्याला वाटत असेल, तर मग त्याचे प्रमाण आता जनुकीयदृष्ट्या निगडीत लोकसंख्येत कमी कसे होऊ लागले ?


३. उदाहरण तिसरे-

आपल्या श्वासनलिकेच्या वरच्या टोकाला एक अवयव आहे, ज्याला आपण स्वरयंत्र (voice box / adam's apple/ larynx) असे म्हणतो. आता मेंदूतून येणाऱ्या 'व्हेगस' नावाच्या एका नर्व्हची शाखा जी रिकरन्ट लॅरिन्जीयल नर्व्ह या नावने ओळखली जाते ती बाहेर येऊन संदेशवहनासाठी या स्वरयंत्राला सप्लाय करत असते.

आता विविध प्राण्यांमध्ये या रिकरन्ट लॅरिन्जीयल नर्व्हची रचना पाहू -

माशांमध्ये श्वासनलिकेच्या या वरच्या टोकाकडील अवयवाला 'गिल्स'(gills) असं म्हणतात; यातील तारांची उघडझाप करुन मासे अधिक परिणामकारकरितीने ऑक्सिजन-कार्बनडायऑक्साइडची देवाणघेवाण करतात, तर मोकळ्या हवेत अशाच तारांचा वापर  करुन इतर सजीव आवाज निर्माण करतात. मात्र माशांमध्ये मान हा अवयव नसतोच आणि मेंदू, हृदय व गिल्स हे सारे अवयव जवळजवळ असतात. त्यामुळे मेंदूतून निघालेली तार हृदयाच्या मागून थेट या 'गिल्स'पर्यंत जाते. पुढे जमिनीवर प्राण्यांना मान हा अवयव दिसू लागला; मेंदू वर आणि हृदय बरेच खाली आणि स्वरयंत्र दोघांच्या मध्ये राहिले. पण गंमत पहा, रिकरन्ट लॅरिन्जीयल नर्व्हने आपला मार्ग बदलला नाही; ती आजंही मेंदूपासून हृदयापर्यंत खाली येते, हृदयाच्या महाधमनीला वळसा घालून मग स्वरयंत्रापर्यंत परत वर जाते. वास्तविक कुठल्याही अवयवाचा मेंदूशी संपर्क राखणारी नर्व्ह हा कितीतरी महत्वाचा अवयव असतो, उद्या तिला काहीही दगाफटका झाला, तर अवयव मेल्यातंच जमा होतो बापडा ! आता समजा निर्मात्याने एक-एक सजीव स्वतंत्र बनवला असता, तर अशा महत्त्वाच्या अवयवाचा मार्ग शक्य तितक्या सोप्या मार्गाने असा यूटर्न न घेता थेट आखला असता. रिकरन्ट लॅरिन्जीयल नर्व्हच्या अशा विनाकारण लांबवलेल्या कोर्समुळे तिला इजा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते आणि तशी इजा बरेचदा होतेसुद्धा! आता माशांमध्ये केली ती रचना बरोबरंच आहे हो, पण याच रचनेप्रमाणे जिराफासारख्या प्राण्यांमध्ये तर हीच नर्व्ह तब्बल पंधरा फुटांपर्यंत लांब असते आणि अशी रचना अनावश्यक व सदोष ठरते.

याचं सोपं कारण असंच आहे, की गरज पडल्यावर उत्क्रांत असताना, सजीवांच्या शरीराचा मुळ आराखडा तोच राहिला, फक्त नॅचरल सिलेक्शनला अनुसरुन काही बदल होत राहिले !

याव्यतिरिक्त अपेंडिक्स, प्रोस्टेट ग्लॅन्ड, फुफ्फुसातील लिंग्यूला, प्रोनेटर टेरेस नावाचा स्नायू असे बरेच रचनाशास्त्रदृष्ट्या दोष दिसतात, कि जे थेट मानव किंवा कोणताही सजीव स्वतंत्रपणे निर्माण करायला घेतला असता, तर होण्याचे काही प्रयोजन नव्हते !

उत्क्रांती न मानणाऱ्यांचा मतप्रवाह साधारण असा असतो, ईश्वराने सजीवसृष्टीची निर्मिती ती सध्या आहे तशाच अवस्थेत अमुक एक वर्षांपुर्वी केली त्यात विकास होत नसून ऱ्हास होत आहे; पण मग अशावेळी ही निर्मिती तेव्हापासून निर्दोष असायला हवी आणि त्यात मागाहून दोष निर्माण होताना दिसले पाहिजेत. पण प्रत्यक्षात उलट प्रकार दिसतोय, जुन्या डिझाईन मध्ये दोष दिसत आहेत !

शरीररचनेतील हे दोष सुर्यप्रकाशासारखे लख्ख आहेत.. त्यामुळे ते नाकारणे हे तर डोळे बंद करण्यासारखे आहे.. त्यामुळे किमान सकलसंपन्न जीवसृष्टी ईश्वराने निर्माण केली आणि तिथून पुढे तिचा विकास होत नसून ऱ्हास होत आहे हा चुकीचा सिद्धांत ठरतो.

उलट सजीवसृष्टीची सुरुवात एकपेशीय सजीवांपासूनंच होऊन पुढे उत्क्रांतीवाद सांगतो त्याप्रमाणे प्रकृतीतील काही गुण-दोषांसकट सजीवसृष्टीचा प्रवास चालू आहे हे मान्य करावेच लागेल !


- ©डॉ. सागर पाध्ये


(लेखनाचे हक्क लेखकाकडे राखीव असून,लेखकाच्या नावाशिवाय लेख अन्यत्र प्रसारीत केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.)

अॅटीबायोटीक्स !

कोविडमुळे झालेल्या एकूण मृत्यूपैकी ६०% मृत्यू हे केवळ अॅन्टीबायोटीकच्या अतिवापरामुळे झालेत, अशी एक बातमी आहे. या दुर्दैवी बातमीत तथ्य असणार,...