रंग यांचा वेगळा !
सप्टेंबर २०१८, भारतात समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाली. त्यानंतर काहीकाळ पुन्हा यविषयी समाजात उलट-सुलट चर्चा झडल्या. इथे सामान्य व्यक्तींमध्ये निसर्गतः 'नॉर्मल' समजल्या जाणाऱ्या लैंगिक संबंधांबाबतंच प्रचंड गैरसमज असतात, तिथे या अशा विषयाबाबत काय बोलावे ? वास्तविक समलैंगिकता किंवा 'मधले असणं' हा विषय मानवी इतिहासाला नवीन नाही. बायबल, कुराण यांसारख्या धर्मग्रंथांत, हिंदू पुराणांत वा ग्रीक साहित्यात प्राचीन काळापासून कमी-अधिक फरकाने या विषयी उल्लेख सापडतात. यामागची पुरेशी कारणमीमांसा ठाऊक नसल्याने म्हणा किंवा बहुसंख्य समाजाच्या मनोधारणेच्या अगदी विरुद्ध असा हा प्रकार असल्याने काही धर्मांत त्याकडे पाप वा दोष म्हणून पाहिले गेले. धर्मशास्त्र काय म्हणते हा माझ्या लेखाचा विषय नाही. मी वैद्यकशास्त्रीय दृष्टिकोनातून याविषयी लिहिणार आहे.
समाजातील व्यक्तींची साधारणतः दोन प्रकारची लिंगं सांगितली जातात - स्त्री आणि पुरुष ! जन्माला येणारं बाळ कुठल्या लिंगाचं असेल, हे गुणसुत्रांवरून ठरतं. गुणसुत्रांपैकी 'लिंग गुणसुत्रे' (sex chromosomes) ही 'एक्स-एक्स' (XX) असतील, तर स्त्री व 'एक्स-वाय'(XY) अशी असतील, तर पुरुष. ही गुणसुत्रीय रचना गर्भधारणेच्या (Fertilization) वेळीच निश्चित झालेली असते. रचनाशास्त्राच्या दृष्टीने प्राथमिक लैंगिक अवयव (primary sexual organs - gonads) असल्याने वा नसल्याने लिंग ठरतं. वृष्ण (अंडकोष - testis) असतील तर पुरुष आणि अंडाशय (ovaries) असतील तर स्त्री.
सामान्यतः एखाद्या व्यक्तीच्या लैंगिकतेबाबत अनिश्चितता असेल किंवा ती व्यक्ती स्त्री आणि पुरुष अशा दोघांचेही गुणधर्म दाखवत असेल, तर त्याला सामान्य माणूस 'छक्का/हिजडा' म्हणतो.. पॉर्न इंडस्ट्रीत Shemale ही संकल्पना हॉर्मोनल थेरेपी/सर्जरी करून स्वत:ला स्त्रीचे गुणधर्म 'चिकटवून' घेणाऱ्या व्यक्तीबाबत वापरली जाते..
मातेच्या गर्भाशयात गर्भाची लैंगिक रचना कशी होते, ते थोडं विस्ताराने पाहू.
त्याआधी एक बेसिक कन्सेप्ट -
आपली 'डिफॉल्ट' लिंगविशिष्टता ही स्त्री-रुपाची असते !!
गर्भावस्थेत सहाव्या आठवड्यापर्यंत आपण सगळेच स्त्री रुपात असतो !!!!
समजा, गर्भाचं गुणसुत्रीय लिंग 'पुरुष' आहे, अर्थात लिंग गुणसुत्रं XY अशी आहेत; तर गर्भावस्थेच्या सहाव्या आठवड्यात अंडकोष (testes) बनू लागल्यावर पुरुष संप्रेरके (Androgens) स्त्रवली जातात आणि त्या प्रभावाखाली पुरुषी गुणधर्मांची वाढ होते. पुरुषांच्या पोटात बनणारे अंडकोष (testes) गर्भावस्थेच्या नवव्या महिन्यात शेवटी वृष्णात(scrotum) उतरवले जातात.
आता या हॉर्मोन्सच्या कामामध्ये काहीही बिघाड झाला की, बाळ जन्माला येतं तेव्हा स्त्रीरुपातंच दिसतं ! जेव्हा वयात आल्यानंतरही पाळी येत नाही, त्यावेळेस तपास केल्यावर कळतं -
१. स्त्री आहे पण स्त्रीप्रमाणे प्रजननसंस्थेची वाढ झालेलीच नाही.
२. पुरुष आहे, पण गर्भावस्थेत असल्यापासून लैंगिक अवयवांची वाढ झालीच नाही म्हणून बाहेरून स्त्रीसारखा दिसतो..
इन फॅक्ट या दुसऱ्या प्रकारात हे स्त्री सारखे दिसणारे पुरुष अधिक आकर्षक दिसतात, कारण यांच्या पुरुषी संप्रेरकांचं (androgens) मोठ्या प्रमाणात स्त्री-संप्रेरकात (estrogen) रुपांतर होत राहते आणि तितक्या चांगल्या प्रकारे स्त्रियांचे शारिरीक गुणधर्म यांच्यात डेव्हलप होत राहतात. (गुगल सर्च करा - Testicular feminization syndrome)
गुणसुत्रीय लिंग (XX किंवा XY) हे दोन आजारांत प्रामुख्याने बदलतं -
१. टर्नर सिंड्रोम (जनुकीय लिंग - XO)
गर्भात बाह्य जननेंद्रिये स्त्रीची असली तरी ओव्हरीज व गर्भाशय विकसित होत नाही.
२. क्लाईनफेल्टर (जनुकीय लिंग -XXY) - हिजडा
क्लाईनफेल्टर हे जन्मत:पुरुष दिसतात, पण बरेचदा काही रचनाशास्त्रीय विकृती दिसते. पुढे वयात आल्यावर आवश्यक ते बदल होत नाहीत.
इतर प्रकार -
३. अॅन्ड्रोजेन इन्सेन्सिटीव्ह सिंड्रोम -
अर्थात (पुरुषाच्या शरीरातील) पुरूष संप्रेरकांबद्दलची असंवेदनशीलता ! गर्भ पुरूषाचा असला, तरी पुरुषी जननेंद्रिये विकसित झालेली नसतात.
४. काहीवेळेस पुरुष संप्रेरकांची (मेल हॉर्मोन्स - अॅन्ड्रोजेन्स ) पातळी शरीरात खूप जास्त वाढते. पुरुष गर्भ असल्यास याने काही फरक पडत नाही; पण स्त्रीचा गर्भ असेल तर तिचं वागणं-बोलणं पुरुषी असू शकतं. वयात आल्यावर तिला स्त्रियांविषयी आकर्षण वाटू शकतं.
५. टेस्टोस्टेरॉन सारख्या पुरुष संप्रेरकांची पातळी पुरुष गर्भात कमी असल्यास पुरुष स्त्रीसारखा वागू लागतो. वयात आल्यावर त्याला पुरुषांचं आकर्षण वाटू लागतं.
कुठल्याही व्यक्तीची स्वतःच्या लिंगाबाबतची वैयक्तीक भावना (मी कोण आहे ?) म्हणजे 'जेन्डर आयडेन्टीटी' किंवा 'लिंगभावना'. अर्थात रचनाशास्त्रीयदृष्ट्या लिंग आणि मानशास्त्रीयदृष्ट्या स्वतःविषयीची लिंगभावना या दोन्हीही भिन्न गोष्टी आहेत. सामान्यत: बहुतांश पुरुषांना आपण पुरुष आहोत असंच वाटत असतं आणि स्त्रियांनाही आपण स्त्री आहोत असंच वाटत असतं. क्वचित काहींमध्ये ही 'लिंगभावना' वेगळी असू शकते. आपण अमुक एका लिंगाच्या व्यक्तीसारखे वाटत असलो, तरी आपण भिन्न आहोत ही भावना या व्यक्तींमध्ये प्रबळ असते. अशी ही वेगळेपणाची भावना आणि त्यामुळे येणारी अस्वस्थता वा खिन्नता म्हणजे 'जेन्डर डिसफोरीया' (Gender dysphoria). ज्या व्यक्तींना अशा पद्धतीने भिन्नलिंगी व्यक्ती म्हणून जगावं लागतं, त्यांना म्हणतात, 'ट्रान्सजेंडर्स', काही व्यक्ती आधुनिक वैद्यकशास्त्राची मदत घेऊन स्वतःच्या शरीरात असे बदलंही करून घेतात, त्यांना म्हणतात, 'ट्रान्ससेक्शुअल्स' ! अशा व्यक्तींचे लैंगिक वर्तनंही अर्थातंच भिन्न असते. शरीररचनेच्या दृष्टीने पाहता पुरुष असूनंही त्यांना पुरुषाविषयी आकर्षण वाटू शकते, अशा पुरुषांना 'गे' म्हणतात किंवा स्त्री असूनंही स्त्री विषयी आकर्षण असू शकते, अशा स्त्रियांंना 'लेस्बियन' म्हणतात. काही स्त्री व पुरूष दोघांशीही लैंगिक संबंध ठेवतात त्यांना 'बायसेक्शुअल' म्हणतात. अशा सर्व व्यक्तींसाठी एल. जी. बी. टी. (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर्स) नावाची चळवळ आहे.
(LGBT pride flag)
एखाद्या व्यक्तीची लिंगभावना वेगळी का असू शकते किंवा त्यास समलिंगी व्यक्तीविषयी का आकर्षण वाटू शकते, हे अजूनंही पुर्णपणे न उलगडलेलं कोडं आहे. जनुकीय अभ्यासातून समलिंगी संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींमध्ये काही जनुकीय साधर्म्ये आढळतात; पण अमुक एक जनुक यासाठी जबाबदार असतं हे ठामपणे सांगता येत नाही. नैसर्गिक विरुद्धलिंगी संबंध ठेवणाऱ्या पालकांनी वाढवलेली मुलं समलिंगी असू शकतात किंवा समलिंगी पालकांनी वाढवलेली मुलं विरुद्धलिंगी असू शकतात. एक मात्रं नक्की कोणत्याही उपचारांनी लिंगभावना वा लैंगिक आकर्षणाची भावना बदलता येते असं नाही. ती निसर्गत:च जशी असते तशी असते. पुरुष वा स्त्री संप्रेरकांच्या कमी-जास्त प्रभावातून व्यक्तीच्या सामान्य किंवा लैंगिक वर्तनात बदल होऊ शकतो ( उदा. प्रणयाच्या वेळी आक्रमक होणे, प्रियकरास प्रतिसाद देणे इ.); परंतू त्यामुळे समलैंगिक आकर्षण निर्माण होऊ शकते, असे ठामपणे सांगता येत नाही(Alfred kinsey 1941).
सोप्या मराठीत ही माहिती अच्युत गोडबोल व नीलांबरी जोशी लिखित 'मनकल्लोळ' या पुस्तकातंही वाचता येईल.
मादक द्रव्यांचे अतिसेवन, काही मनोविकार यातून काही व्यक्ती अनैसर्गिक लैंगिक संबंध वा समलैंगिक संबंध यासाठी प्रवृत्त होतात, वेश्याव्यवसायांत काही जबरदस्तीने यात ओढले जातात; या गोष्टी खऱ्या असल्या, तरी आधी जे प्रकार सांगितले त्यांतली मुळची लिंगभावना बदलता येत नाही. किंबहुना शास्त्रज्ञही त्याकडे मनोविकार म्हणून न पाहता नैसर्गिक भावना म्हणूनंच पाहतात.
आल्फ्रेड किन्से यांनी पहिल्यांदा १९४८ साली Sexual behavior in the human male या नावाने हे पुस्तक लिहिलं. १९४९ सालची या पुस्तकाची आवृत्ती Archive.org वर पीडीएफ स्वरुपात उपलब्ध आहे. त्यानंतर आल्फ्रेड किन्से यांनी Sexual behavior in the human female या नावानेही पुस्तक लिहिलं. या पुस्तकांमुळे त्याकाळी बरीच खळबळ माजली होती. या पुस्तकांत समलैंगितेवरंही स्वतंत्र प्रकरणं आहेत. त्यात किन्से यांनी बरेच सांख्यिकीय निष्कर्ष मांडले आहेत. अर्थात बरेचदा व्यक्ती आपली अशी वैयक्तीक माहिती मुक्तपणे उघड करतातंच असं नाही; त्यामुळे या आकडेवारीस मर्यादा येतात. पण किन्से यांनी काही निष्कर्ष मांडले त्यानुसार पौगंडावस्थेत समलैंगिक संबंधांचा अनुभव घेतलेल्या व्यक्तींत वाढत्या वयानुसार दर आठवड्यास असे संबंध ठेवण्याचे प्रमाण वाढत जाते. शिवाय ग्रामीण भागात शहरी भागापेक्षा समलैंगिक संबंधांचे प्रमाण कमी असते. महाविद्यालयीन मुलांमध्ये मात्र अशी शहरी-ग्रामीण तफावत आढळत नाही. चर्चमध्ये जाणाऱ्या वा धार्मिक वृत्तीच्या मुलांमध्ये समलैंगिक संबंधाचे प्रमाण कमी असते, असेही किन्से यांनी म्हटले आहे (Sexual behavior in the human male,1949 page no. 636). धार्मिक वृत्तीच्या व्यक्तींमध्ये पाप लागण्याच्या भितीनेही हे प्रमाण कमी असू शकतं.
आतापर्यंत इतकं वाचल्यावर अनेकांची भावना, 'असू दे ना मग; मला काय त्याचे ?' अशी असू शकते; किंवा मग अशा गोष्टी अजून कायदेशीर करून, त्याबद्दल बोलून-लिहून प्रोत्साहन का द्यावे, असंही कोणी म्हणेल. विषयाचे गांभीर्य व त्यातील तथ्य कळावे याच उद्देशाने मी ही माहिती दिली. एकदा समलैंगिकता हा कुठलाही आजार नाही किंवा काही अपवाद वगळता या नैसर्गिक निवडीत काही बदलंही करता येत नाहीत, हे लक्षात आल्यावर समाजात या व्यक्तींना व त्यांच्या भावनांना स्विकारणे अतिशय गरजेचे आहे. https://www.ncbi.nlm.nih.gov या अमेरिकन वेबसाईटवर याविषयासंदर्भात केलेले अनेक अभ्यास, सांख्यिकीय माहिती उपलब्ध आहे. त्यातील एका इ. स. २००० मध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रबंधातील काही निष्कर्ष इथे थोडक्यात देतो -
१. साधारणतः एकूण लोकसंख्येच्या १०% लोकसंख्या ही लेस्बियन, गे, बायसेक्शुअल किंवा ट्रान्सजेंडर प्रकारात मोडते.
२. साधारणतः दोन तृतीयांश डॉक्टरंच आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांच्या लैंगिक निवडी विचारात घेत नाहीत.
३. उपरोल्लेखित चार प्रकारांत मोडणाऱ्या व्यक्तींपैकी सुमारे ४०%व्यक्ती एकदा तरी आत्महत्येचा प्रयत्न करतात.
४. Secretary of the Department of Health and Human Services, Task Force on Youth Suicide in 1989 च्या रिपोर्ट नुसार एकूण आत्महत्यांपैकी ३०% आत्महत्या या अशा व्यक्तींकडून होतात.
५. अशा व्यक्तींपैकी जवळपास ९५% व्यक्ती या समाज, मित्रमंडळी यांच्यापासून वेगळ्या पडलेल्या असतात.
६. यांपैकी किमान २०% लोकांचा मानसिक वा शारिरीक छळ झालेला असतो.
७. अशा मुलांमध्ये शाळा सोडण्याचे प्रमाण पाचपट अधिक असते.
८. यांच्यापैकी किमान ६०% व्यक्ती कुठल्यातरी मादक द्रव्याच्या आहारी गेलेले असतात. इंजेक्शन्स वापरून मादक द्रव्ये टोचून घेण्याचे प्रमाण नऊपट अधिक असते.
९. घरच्यांनी घराबाहेर काढली गेलेली ही मुलं बरेचदा अनाथाश्रामातंही स्विकारली जात नाहीत. ती रस्त्यावर राहतात. इच्छेने वा जबरदस्तीने वेश्याव्यसायात येतात. गुप्तरोगांचे प्रमाण त्यांच्यामध्ये लक्षणीयरित्या जास्त असते.
१०. शिक्षण आणि समुपदेशनाच्या अभावी सुमारे ८०% गे व्यक्तींना कॉन्डम कसे वापरावेत हेसुद्धा माहित नसतं !
वरील निष्कर्ष पाहता या व्यक्तींना समाजात स्विकारुन त्यांचे हक्क, त्यांचे सन्मान त्यांना परत देणे; किती गरजेचे आहे हे लक्षात येईल !
समलैंगिक संबंधांसोबत आणखी एक विषय ओघानेच येतो, तो म्हणजे अनैसर्गिक लैंगिक संबंध ! वास्तविक लैंगिक संबंधांमागे निसर्गाचा एकंच उद्देश असतो, प्रजनन ! त्या उद्देशानुसार पुरुषाचं वीर्य स्त्रीच्या योनीमार्गाद्वारे अंडपेशीपर्यंत जाणं महत्वाचं ! पण अशा लैंगिक संबंधांना मुळातुनंच प्रेरणा मिळावी, यादृष्टीने निसर्गाने शरीराची रचना केलेली असते. प्रजननक्षम वयात पुन्हापुन्हा लैंगिक इच्छा जागृत होणं आणि या संबंधातून आनंद मिळणं ही यादृष्टीने झालेली नैसर्गिक रचना आहे. नाहीतर कोण कशाला लैंगिक संबंधांना पुढाकार घेईल ? मानव हा वर्षभर जननक्षम असणारा प्राणी आहे. साहजिकंच त्याची लैंगिक क्षुधाही वर्षभर टिकून असते. त्यामुळे लैंगिकता ही गोष्ट केवळ प्रजननापुरता मर्यादित राहत नाही. लैंगिक संबंधांतून मिळणारा आनंद हा शरीराच्या एका अतिशय जटिल रचनेचा परिपाक आहे. त्यामध्ये असे काटेकोर नियम नसतात. बंद दाराआड कोणाला काय हवं असतं याचेही नियम नसतात. मुळात लैंगिक आवडी निवडी या थेट वर्गीकरण करता येण्याजोग्या दोन ध्रुवांवरच्या गोष्टी नाहीत. त्याचा एक 'स्पेक्ट्रम' असतो. सगळे त्या स्पेक्ट्रमच्या अधेमधे कुठेतरी येतात. हा स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. पण तुर्तास इतकं सांगतो, की सदासर्वदा या किंचित वेगळ्या आवडी-निवडी म्हणजे विकार नसतात. खाण्या-पिण्याच्या वगळून वगैरे जशा वेगवेगळ्या आवडी-निवडी असतात, तशाच याही ! एका मर्यादेपर्यंत वैद्यकशास्त्रंही त्याकडे विकार म्हणून पाहत नाही.
अर्थात ज्या अवयवांची रचना लैंगिक संबंधासाठी झाली आहे, ते सोडून अन्य वस्तू वा अवयव लैंगिक सुखासाठी वापरणे, यातून काही आरोग्यविषयक समस्या निर्माण होतातंच. शरीराला इजा होणे, गुप्तरोगांचे व पर्यायाने कर्करोगासारख्या आजारांचे प्रमाणंही अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवणाऱ्यांमध्ये अधिक दिसते. अनेकांना आता यातून दिवस जाणार नाहीत, त्यामुळे कॉन्डम्स वगैरेचा अडसर कशाला असेही वाटते. वास्तविक एचआयव्ही व गुप्तरोगांपासून बचाव हासुद्धा कॉन्डमचा एक उपाय आहेच !
आजवर अनेकांनी मला कुजबुजत्या स्वरात 'हे योग्य की अयोग्य' असा प्रश्न केला आहे. यात योग्य-अयोग्य, पाप-पुण्य काहीही नाही. जोडीदाराच्या भावनांचा आदर, पुरेशी स्वच्छता व आरोग्यविषयक आवश्यक ती काळजी घेणे इथे अपेक्षित असते. त्यासाठी शिक्षण आणि समुपदेशन हवे. त्या व्यक्तीनेही याबद्दलची अपराधी भावना सोडून पुढे येऊन बोलणे आणि जो पुढे येऊन बोलतोय त्याला सर्वांनी स्विकारणे फार गरजेचे आहे !
डॉ. सागर पाध्ये

No comments:
Post a Comment