कोविडमुळे झालेल्या एकूण मृत्यूपैकी ६०% मृत्यू हे केवळ अॅन्टीबायोटीकच्या अतिवापरामुळे झालेत, अशी एक बातमी आहे. या दुर्दैवी बातमीत तथ्य असणार, याची मला खात्री आहे.
मात्र अनेक बहाद्दरांनी बघा बघा तुमच्या औषधांमुळे कसे घातक साईड इफेक्ट्स होतात, असं एक टुमणं लावलंय. त्यांनी एकदा नक्की परिस्थिती काय आहे ती स्वतः पहावी. एकतर बातमीत स्पष्ट 'बेसुमार वापर' म्हटलंय. 'अति सर्वत्र वर्जयेत' हा नियम इथेही लागू होतो आणि कोणतंही शास्त्र विद्येच्या अनिर्बंध वापरास कधीच परवानगी देत नसते. तेव्हा हा दोष वैद्यकशास्त्राचा नक्कीच नाही. लहान मुलाच्या हातात बंदुक दिल्यावर काय घडू शकतं, हे सर्वांनाच कळतं; पण म्हणून बंदूकीला दोष देऊन 'सीमेवरच्या जवानांच्या हातात बंदुका देऊ नयेत, त्याऐवजी दगडगोटेच बरे' असं म्हणणं म्हणजे मुर्खपणा आहे ! त्यापेक्षा आपण जी औषधं वापरतो आणि ज्या डॉक्टरांचा सल्ला घेतो,त्याविषयी योग्य ती माहिती घेणं आवश्यक आहे.तेव्हा यावर बोलायलाच हवं असं मला मनापासून वाटतंय.
अॅन्टीबायोटीक म्हणजे काय ? तर एका सुक्ष्मजीवापासून मिळवलेला असा पदार्थ, जो दुसऱ्या सुक्ष्मजीवाविरुद्ध वापरता येतो, त्याला म्हणायचं अॅन्टीबायोटीक. उदाहरणार्थ, पेनिसिलिअम या बुरशीपासून मिळालेलं 'पेनिसिलीन' हे औषध काही जीवाणूंविरुद्ध (Bacteria) वापरता येतं; तसंच 'स्ट्रेप्टोमायसिस नोडोसम' या जीवाणूपासून मिळालेलं अॅम्फोटेरिसीन हे औषध म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजारात वापरता येतं.
बरीचशी सुक्ष्मजीवविरोधी (Antimicrobials) औषधं आता प्रयोगशाळेत तयार केली जातात. फारंच थोडी सुक्ष्मजीवांपासून मिळवली जातात. तेव्हा सर्वच सुक्ष्मजीवविरोधी औषधांना अॅन्टीबायोटीक म्हणणे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे आहे; पण मुळ बातमीचा मथितार्थ त्यामुळे बदलत नाही. 'सुक्ष्मजीवविरोधी (Antimicrobial) औषधांच्या अतिवापरामुळे ६०% मृत्यू झाले' हे सुधारित विधान आपण लक्षात घेऊ आणि पुढे चर्चा करू.
सातत्याने सुक्ष्मजीवविरोधी औषधं वापरल्यामुळे बरेचदा सुक्ष्मजीव त्या औषधाविरुद्ध कसं लढायचं हे शिकून घेतात, पुढे त्या औषधांचा सुक्ष्मजीवांवर परिणाम होईनासा होतो. याला म्हणतात, 'ड्रग रझिस्ट्न्स', आपण म्हणूया 'द्रव्यरोध' ! याशिवाय बरेचदा एका सुक्ष्मजीवाविरुद्ध एक औषध वापरल्यास तिथे दुसराच सुक्ष्मजीव बोकाळतो. हे म्हणजे चोरून दूध पितं म्हणून घरातलं मांजर बाहेर सोडून द्यावं, तर घरातले उंदीर माजावेत असा प्रकार असतो. इतकं उदाहरण दिल्यावर या प्रकरणातील औषध वापराची अपरिहार्यता आणि मर्यादा या दोन्हीही गोष्टी लक्षात येतील.
यावर उपाय म्हणजे सुक्ष्मजीवविरोधी औषधांचा बेछूट वापर थांबवणे. गरज असल्यावरंच आणि योग्य ते निदान झाल्यावरंच ही औषधं घेणे आणि त्याचा पूर्ण कोर्स करणे. कोणतीही राष्ट्रीय किंवा जागतिक आरोग्य संघटना, शास्त्रज्ञ, वैद्यकशास्त्राची पाठ्यपुस्तके सुक्ष्मजीवविरोधी औषधांच्या बेछूट वापरास प्रोत्साहन देत नाहीत. जागतिक आरोग्य संघटना तर दरवर्षी १८ ते २४ नोव्हेंबर या काळात 'World Antimicrobial awareness week' साजरा करते.
भारतात आरोग्य व्यवस्थेची काय अवस्था आहे, हे सर्वांना माहित आहे. जेमतेम नावापुढे 'डॉ.' लावण्याइतपत नावापुरतीच पदवी घेऊन गावागावांत टपऱ्या लावणारे असंख्य आहेत. गेल्या अडीच-तीन वर्षांत जी काही भटकंती करून प्रत्यक्ष अनुभव घेतले आहेत, ते हादरवणारे आहेत. साधा सर्दी-खोकला-ताप, जुलाब, पोटदुखी यावर सुक्ष्मजीवविरोधी औषधं देणारे डॉक्टर्स मी पाहिले आहेत. यातील बहुतांश BAMS किंवा BHMS किंवा मध्यमवयीन MBBS पदवीधारक असून, यातील पहिल्या दोघांना बरेचदा या औषधांचे जुजबी म्हणावे इतकेही ज्ञान नसते. आधुनिक वैद्यकशास्त्राचे तरूण पदवीधर हा बेछूट वापर टाळतात, हा माझा सामान्य अनुभव आहे. अर्थात या सर्वांस अपवादही सर्वत्र सापडू शकतील.
घसा दुखला की अझिथ्रो (Azithromycin), पोटात दुखलं की नॉरफ्लॉक्स (Norfloxacin), सर्दी-खोकल्याला अॅमॉक्स (Amoxycillin), जुलाब झाले की मेट्रो (Metronidazole) असा गोळीबार चालू असलेला सहज दिसतो, जो पुर्णतः चुकीचा आहे. जागतिक आरोग्य संघटनेने वारंवार सूचना देऊनही कोरोनाच्या रुग्णांना डॉक्सिसायक्लीन, अझिथ्रोमायसिन एकत्र देण्यात येतात. त्याचे दुष्परिणाम अनेकांना जाणवतात. बरं ही औषधं आधुनिक असली, तरी देणारा आधुनिक वैद्यकशास्त्राचा पदवीधर असतोच असं नाही. बरेचदा औषधांच्या दुकानात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय या गोळ्या देण्यात आणि घेण्यात येतात. अशावेळी दोष त्या शास्त्राचा किंवा औषधाचाही नसून ती औषधं वापरणाऱ्याचा असतो.
सगळ्यात आधी आपण जे डॉक्टर आपले फॅमिली डॉक्टर म्हणून निवडता, त्यांची पदवी, पदवी देणारं महाविद्यालय जाणून घ्या. डॉक्टर BAMS, BHMS, MBBS अशा ज्या कुठल्या पॅथीचे असतील, त्यांच्याकडून त्याच पॅथीचं औषध घ्या. स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जाण्याची वेळ आली, तरी त्यांच्या ट्रीटमेंटसाठीही आपल्या फॅमिली डॉक्टरांचं 'सेकंड ओपिनियन' घ्या ! सुशिक्षित तरुणांनी मिळालेली औषधं एकदा 'गुगल' करून पाहण्यास हरकत नाही ! मुख्य म्हणजे जे आधीपासून सांगत आलो आहे, टिव्ही-वृत्तपत्रांतील उलटसुलट हेडलाईन्स पाहून गोंधळून जाऊ नका. अधिकृत स्त्रोतांद्वारेच माहिती घेण्याची सवय लावा.
जनहित में जारी !
धन्यवाद !
डॉ. सागर पाध्ये.
